डोडा जिल्हा दहशतवादमुक्त

    दिनांक :29-Jun-2020
|
शेवटचा अतिरेकी ठार
तोयबा, हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा
 
श्रीनगर, 
जम्मू-काश्मिरातील डोडा जिल्हा दहशतवादमुक्त झाल्याची अधिकृत घोषणा आज सोमवारी करण्यात आली. या जिल्ह्यात जिवंत असलेल्या शेवटच्या अतिरेक्याचा आज सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी चकमकीत खातमा केला. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात जवानांनी आज लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या तीन अतिरेक्यांना ठार मारले. यात तोयबाचा जिल्हा कमांडर आणि हिजबुलच्या वरिष्ठ कमांडरचा समावेश आहे. यातील हिजबुलचा कमांडर मसूद हा डोडा जिल्ह्यातील होता आणि येथे सक्रिय असलेल्यांपैकी तोच शेवटचा अतिरेकी होता. त्याला ठार मारण्यासोबत हा जिल्हा आता पूर्णपणे दहशतवादमुक्त झाला असल्याची घोषणा पोलिस प्रवक्त्याने दिली.
 

terrorists-29_1 &nbs
एका बलात्कार प्रकरणात पोलिसांना तो हवा होता, पण त्याचा कुठेही शोध लागला नाही. काही दिवसानंतर सोशल मीडियावर त्याचे एके-47 रायफल हाती घेतलेले छायाचित्र व्हायरल झाले. आता मी हिजबुलचा सदस्य आहे, असे त्याने त्यात लिहिले होते, असे प्रवक्ता म्हणाला. यापूर्वी अतिरेक्यांचा गड अशी ओळख असणारा त्राल जिल्हा दहशतवादमुक्त करण्यात आला होता. त्यानंतर आता डोडा जिल्हाही दहशतवाद्यांच्या कचाट्यातून मुक्त करण्यात आला. दरम्यान, अनंतनागच्या खुल कोहार येथे काही अतिरेकी आल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. जवानांना पाहताच अतिरेक्यांनी गोळीबार केला. यावेळी झडलेल्या चकमकीत तोयबा आणि हिजबुलच्या तीन अतिरेक्यांना ठार करण्यात आले.