सय्यद गिलानीने सोडली हुर्रियत

    दिनांक :29-Jun-2020
|
फुटीरतावाद्यांमध्ये मोठी फूट
 
श्रीनगर, 
फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानीने आज सोमवारी हुर्रियत कॉन्फरन्सचा राजीनामा दिला. 2003 मध्ये त्याने हा गट स्थापन केला होता. त्याच्या राजीनाम्यामुळे फुटीरतावाद्यांच्या चळवळीत मोठी फूट पडणार आहे.
 
 
चार ओळींचा राजीनामा आणि एक ऑडिओ संदेश त्याने प्रसारमाध्यमांना जारी केला. यात त्याने आपल्या राजीनाम्याची आणि त्यामागील कारणांची माहिती दिली आहे. याशिवाय, त्याने हुर्रियतच्या सर्व घटकांनाही सविस्तर कारण देणारे पत्र लिहिले आहे. हुर्रियतचा तहहयात अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आल्यानंतरही मला राजीनामा का द्यावा लागला, यामागची कारणे त्याने या पत्रात नमूद केली.
 
 
 
sayyad gilani_1 &nbs
 
 
व्याप्त काश्मिरातील हुर्रियत कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांची संघटनेच्याच वरिष्ठ नेत्यांकडून चौकशी केली जात आहे, त्यांच्या अनेक गंभीर आरोप ठेवले जात आहेत. व्याप्त काश्मिरातील सरकारमध्ये मंत्रिपद आणि आमदारकी मिळण्यासाठी ते सत्ताधार्‍यांना खुश करीत आहेत. काही सदस्यांना निष्कासित केले जात आहे, तर काही नेते त्यांच्याच पातळीवर बैठका आणि निर्णय घेत आहेत. भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 निष्प्रभ केले, एका राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश तयार झाले, पण त्यावर एकाही हुर्रियत नेत्याने आपले मत व्यक्त केले नाही आणि विरोधही केला नाही. पुढील धोरण निश्चित करण्यासाठी मी सर्वांना वारंवार पत्र पाठवले, पण त्याचाही फायदा झाला नाही. अशा स्थितीत मी आता या संघटनेशी संलग्न राहू शकत नाही आणि म्हणूनच मी राजीनामा दिला आहे. आता मी तुमच्यापासून कायमचा दूर झालो आहो, असे गिलानी या पत्रात म्हटले आहे.