महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन कायम, सर्व निर्बंध लागू राहणार

    दिनांक :29-Jun-2020
|
  
udhav_1  H x W:
 
 
मुंबई, 
राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. ३० जून रोजी लॉकडाउन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. दरम्यान ठाकरे सरकारने लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.
 
राज्य सरकारने एक महत्त्वाची माहिती यावेळी दिली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पाऊले उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करु शकतात असे राज्य सरकारने सांगितले आहे. कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसंच लोकांच्या हालचालींवर ते प्रतिबंध आणण्याची परवानही त्यांना देण्यात आली आहे.
 
उद्धव ठाकरे यांनी रविवारी समाजमाध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधताना निर्बंध शिथिलीकरणाबाबत ठोस भाष्य करणे टाळले होते. यामुळे निर्बंधांबाबत अनिश्चितता कायम होती. गर्दीच्या आणि रुग्णसंख्या वाढीची भीती असलेल्या रेड झोनमधील निर्बंध अधिक कडक करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. टाळेबंदीचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
 
आजही ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत, पण म्हणून त्यांना संसर्ग नाही, असे म्हणता येत नाही, त्यामुळे ३० जूनला टाळेबंदी संपेल आणि सर्व व्यवहार पुन्हा सुरू होतील या भ्रमात राहू नका, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.