परतवाडा सायमा कॉलनीत स्थानिकांचा विरोध

    दिनांक :29-Jun-2020
|
तालुक्यात पुन्हा दोघांना कोरोना
अचलपूर,
अनलॉक वनमध्ये कोरोना मुक्त झालेला अचलपूर तालुका शेवटच्या टप्प्यात परत कोरोनाग्रस्त झाला. परतवाडा शहरातील सायमा कॉलनी येथील 48 वर्षीय माजी एसआरपीएफ जवानाचा व जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून धोतरखेडा येथे तीन दिवसापूर्वी पॅरोलवर आलेल्या 32 वर्षीय कैद्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीनीसह एकूण तीन रुग्ण सध्या सक्रिय आहेत. वैद्यकीय विद्यार्थीनी परदेशातून आल्यावर थेट अमरावतीलाच क्वारंटाईन झाल्याने तिचा अचलपूर तालुक्यात संपर्क आलेला नाही. अन्य दोघांच्या संर्पकात आलेल्यांना क्वारंटाईन करणे सुरू आहे. मात्र, सायमा कॉलनीतील नागरिक प्रशासनाला मदत न करता अडथळा निर्माण करीत होते.
 

amt 1_1  H x W: 
 
प्राप्त माहितीनुसार परतवाडा शहरातील मुगलाई भागातील सायमा कॉलनी येथील 48 वर्षीय माजी एसआरपीएफ जवान सर्दी, तापाने फणफणत असतांना शहरातील संजीवनी हॉस्पिटलला उपचाराकरिता गेला. तेव्हा डॉक्टरांनी कोविड 19 चे लक्षणे आहे असे सांगून तेथुनच 108 नंबरच्या रुग्णवाहिकेतून त्याला तात्काळ अमरावतीला पाठविले. नंतर त्याचा अहवाल सकारात्मक आला. रविवारी रात्री दहाच्या सुमारास उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी यासह पोलिस प्रशासन त्याच्या थेट संर्पकात आलेल्यांची व त्याच्या परिवारातील लोकांची माहिती घ्यायला गेले असता स्थानिक लोकांनी प्रशासनास विरोध केला. संबंधितांची माहिती लपवत प्रशासनास रात्री 3 वाजेपर्यंत सहकार्य केले नाही. शेवटी त्याच्या परिवारातील दहा व्यक्तींना रात्रीच कल्याणमंडपम येथे विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यात त्याच्या आई व भावाला ताप , तथा खोकला येत असल्यामुळे त्यांनाही रात्रीच अमरावतीला थ्रोट स्वॅब घेण्याकरिता पाठवण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
 
तालुक्यातील धोतरखेडा येथेही अमरावती येथील कारागृहातून पॅरोलवर आलेल्या 32 वर्षाय कैदीचा अहवाल सोमवारी सकारात्मक आल्याने धोतरखेडा गाव सिल करण्यात आले आहे. दोन दिवसापासून गावात आलेला कैदी अनेकांच्या संपर्कात आला असल्याने प्रशासनाकडून यादी तयार करण्यात येत असल्याची माहिती विस्तार अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.
अचलपूर नगर पालिकेतील मुगलाई, सायमा कॉलनी, तसेच दीड किलोमीटरचा परिसर केंटेनमेन झोन करण्यात आला आहे. हाय रिस्क व लो रिस्क यादी तयार करण्यात येत असून स्थानिक लोकांच्या विरोधामुळे प्रशासनावर ताण येत आहे. स्वतःहुन प्रशासनास सहकार्य करावे, असेच राहिल्यास मुगलाई परिसर हॉट स्पॉट होईल. त्यामुळे सहकार्य करून दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नुकत्याच कोरोनामुक्त झालेल्या अचलपूर तालुक्यात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे.