आता चंद्रपुरातही ‘प्लाझ्मा थेरेपी’!

    दिनांक :29-Jun-2020
|
मुख्यमंत्र्यांकडून‘व्हिसी’द्वारे उद्घाटन
चंद्रपूर, 
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्त केंद्रातील ‘प्लाझ्मा थेरेपी’चे उद्घाटन सोमवार, 29 जून रोजी मुख्यमंत्री उध्द ठाकरे यांनी केले. शासकीय रक्तकेंद्र तथा अधिष्ठाता यांच्या कार्यालयातील परिषद दालनाचा वापर करीत मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्याशी संपर्क साधण्यात आला होता. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील रक्त केंद्रात चंद्रपूर जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाग्रस्तांनी ‘कन्व्हलसंट प्लाझ्मा’ या प्रयोगाकरिता दान केले. या ‘कन्व्हलसंट प्लाझ्मा’चा प्रयोगिक तत्वावर वापर अती गंभीर कोरोनाग्रस्त रुग्ण व नातेवाईकांवर रुग्णांच्या संमतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णाचे प्राण वाचण्याकरिता हा प्रयोग अत्यंत प्रभावकारी ठरू शकतो. अशा प्रकारची ‘थेरेपी’ महाराष्ट्रातील एकूण 17 वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्त केंद्रात सोमवारपासून ‘व्हिडीओ कॉन्फरसिंग’द्वारे सुरू करण्यात आलेली आहे. या ‘व्हिडीओ कॉन्फरसिंग’मध्ये अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांच्यासमवेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व सर्व विभाग प्रमुख यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मुख्यमंत्री यांच्या मातोश्री कार्यालयाशी आपली उपस्थिती दर्शविली होती. तसेच प्रत्यक्ष ‘कन्व्हलसंट प्लाझ्मा’ दान करताना रक्तकेंद्राचासुद्धा मातोश्री कार्यालयाशी थेट संपर्क साधण्यात आला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली कन्व्हलसंट प्लाझ्मा दान करण्याकरिता स्वइच्छेने दोन युवतींनी संमती दर्शविली होती. त्यापैकी आज एकीने ‘कन्व्हलसंट प्लाझ्मा’ दान केला आहे.
 
 

chandrapur_1  H 
 
यावेळी रक्तकेंद्रात रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे, रक्तपेढी प्रमुख डॉ. अमित प्रेमचंद, चिकित्सक डॉ. सचित दगडी, छातीरोग तज्ज्ञ डॉ. सौरभ राजुरकर, डॉ. अमोल ठाकरे, जयवंत पचारे, योगेश जारूंडे, अमोल जिद्देवार, वर्षा देशमुख उपस्थित होते. ‘कन्व्हलसंट प्लाझ्मा थेरेपी एफेरेसिंस’ केंद्र उभारण्याकरिता मेट्रो रक्तपेढीतील प्राप्त झालेली ‘अ‍ॅफरेसिंस’ यंत्रासोबतच जिल्हा नियोजन समितीचे, खनिज निधीमार्फत योगदान मिळणार असून, याकरिता पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदीदरम्यान केलेल्या रक्तदानाच्या आवाहनास प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व रक्तदार शिबिर आयोजकांचे तथा स्वच्छिक रक्तदात्यांचे आभार व्यक्त करून, असा प्रतिसाद भविष्यातसुद्धा निरंतर चालू ठेवावा व कोविड होवून मुक्त झालेल्या नागरिकांनीसुद्धा कन्व्हलसंट प्लाझ्मा दान करण्याकरिता स्वयंस्फुर्तीने समोर येण्याचे आवाहन केले. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, संचालक तात्यासाहेब लहाने, प्राजेक्ट प्लॉटीनाचे मुख्य पी. आय. चमुचे सदस्य डॉ. फझल, डॉ. सजल मित्रा, डॉ. सुशांत मेश्राम उपस्थित होते.