वेळेवर पेरणीमुळे यंदाही विक्रमी उत्पादनाची शक्यता

    दिनांक :29-Jun-2020
|
- मान्सून लवकर दाखल झाल्याचा परिणाम
 
नवी दिल्ली, 
सरासरीच्या सामान्य आणि स्थिर प्रगती करणार्‍या मान्सूनमुळे मागील वर्षी 26 जूनच्या तुलनेत यंदा खरीप पेरणीचे प्रमाण दुप्पट झाले आहे. 19 जूनपर्यंत खरिपाचा पेरा 39 टक्क्यांनी वाढल्याने यंदाही धान्याचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 26 जूनपर्यंत 315.6 लाख हेक्टर जमिनीवर खरिपातील पेरा झाला. खरिपाच्या 1064 लाख हेक्टर जमिनीच्या 30 टक्के हा पेरा झाला आहे. 2013 नंतर मान्सूनने प्रथमच वेगवान आगेकूच केली. यंदा 12 दिवस आधीच म्हणजे 26 जून रोजी देश व्यापला आहे.
 
 
 
farming_1  H x
 
 
कृषी क्षेत्राची प्रगती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असले, तरी कृषी उत्पादनांच्या किमती हा चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. नव्या नियमांमध्ये कृषी व्यापाराच्या तरतुदी शिथिल करण्यात आल्या हा मोठा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकर्‍यांच्या एका भागाला नवीन खरेदीदार शोधण्याची परवानगी देण्यात आली. यामध्ये खाद्यप्रक्रिया आणि किरकोळ क्षेत्रातील दिग्गजांचा देखील समावेश आहे.
कोरोना महामारीचा वेगवेगळा परिणाम कृषी क्षेत्रावर झाल्यामुळे हे आणि त्याच्याशी निगडित क्षेत्रांची 2021 या आर्थिक वर्षात 2.5 टक्के वृद्धी झाली आहे. कृषी क्षेत्रातील हालचाली एकसमान नसतात, यामध्ये वैविध्य असते, असे मत याबाबत क्रिसिलने व्यक्त केले आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये देशातील कृषी आणि संबंधित क्षेत्राची एकूण 4 टक्के वृद्धी झाली, तर मागील सहा वर्षांत या क्षेत्राची सरासरी वृद्धी 3.2 टक्के होती.
यंदा आतापर्यंत देशभरात सरासरीपेक्षा 22 टक्के जास्त पाऊस झाला आहे. जून 1 ते 27 या कालावधीत सर्वच मोठ्या कृषी उत्पादक राज्यांमध्ये सरासरीइतका किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला आहे. मान्सूनचे वेळेपूर्वीच आगमन झाल्याने खरिपातील दोन प्रमुख पिके असलेल्या कापूस आणि भुईमुगाचा पेरा यंदा गुजरातमध्ये वाढला आहे. नेहमीपेक्षा लवकर म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून या राज्यात दाखल झाला. संपूर्ण राज्यात चांगला पाऊस झाला, अशी माहिती गुजरात राज्य कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.
 
 
पंजाब आणि हरयाणात सामान्यतः जूनपूर्वीच कापसाची लागवड पूर्ण होते. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ही लागवड जुलैच्या मध्यापर्यंत सुरू असते. यंदा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मान्सून लवकर आल्याने ही लागवड आठवडाभर लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. धान आणि सोयाबीन उत्पादक कापसाकडे वळत असल्याने याचा पेरा यंदा वाढला आहे, अशी माहिती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक व्ही. एन. वाघमारे यांनी दिली.