पंच नितीन मेनन आयसीसीच्या एलिट पॅनेलवर

    दिनांक :29-Jun-2020
|
दुबई,
भारताचा तरुण पंच अशी ओळख असलेल्या नितीन मेनन यांची आज सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात्‌ आयसीसीच्या एलिट पंच पॅनेलवर नियुक्ती करण्यात आली. त्यांनी इंग्लंडचे निगेल लिआँग यांची जागा घेतली.
36 वर्षे वय असलेले मेनन यांनी तीन कसोटी मालिका, 24 एकदिवसीय मालिका आणि 16 टी-20 मालिकांमध्ये पंच म्हणून काम केले आहे. या प्रतिष्ठेच्या पॅनेलवर नियुक्त होणारे ते भारतातील तिसरे पंच ठरले आहेत. यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार श्रीनिवास व्यंकटराघवन्‌ आणि सुंदरराम रवि यांना हा सन्मान मिळाला आहे.
 
 
 
 Punch Nitin Menon on the
 
 
 
आयसीसीचे महाव्यवस्थापक जिऑफ अलार्डाइस, समालोचक संजय मांजरेकर आणि पंच रंजन मडगुले यांचा समावेश असलेल्या निवड मंडळाने एकमताने नितीन मेनन यांची या पदावर नियुक्ती केली आहे. मेनन यापूर्वी अमिरातच्या आयसीसी आंतरराष्ट्रीय पंच पॅनेलवर होते. आयसीसीच्या एलिट पॅनेलवर माझी नियुक्त होणे, हा माझ्यासाठी अतिशय गर्वाचा क्षण आहे. अशा जागेवर नियुक्त होण्याचे स्वप्न मी नेहमीच बघितले आहे, ते आज पूर्ण झाले, अशी प्रतिक्रिया मेनन यांनी व्यक्त केली.