अमरावतीत कोरोना चाचण्यांची संख्या वाढणार

    दिनांक :29-Jun-2020
|
जिल्हाधिकारी नवाल यांची माहिती
अमरावती, 
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रयोगशाळेची तपासणी क्षमताही वाढविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिली. आर्थिक, सामाजिक व्यवहारांना गती देण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता आणणे आवश्यक होते. सध्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. नागरिकांनीही या काळात सजग राहून व्यवहार करावेत व स्वच्छता, सोशल डिस्टन्स, मास्क वापर आदी सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. शाळा- महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय अद्याप झालेला नसला तरीही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासण्यासाठी ई-लर्निंग, ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यास शाळा व्यवस्थापनाला सूचना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.
 

amravti _1  H x 
 
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना पीपीई किट नियमितपणे वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात गत शनिवारपासून कोविड तपासणी सर्वेक्षणाचा तिसरा टप्पा कार्यान्वित करण्यात आला आहे. या माध्यमातून आरोग्य पथकाव्दारे घरोघरी जाऊन जिल्ह्यातील अधिकाधिक कुटूंबांची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनीही स्वत: सजग राहून कुठलीही लक्षणे आढळताच स्वत:हून तपासणीसाठी पुढे यावे व दक्षता पाळावी, असे आवाहन त्यांनी केले.