व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची पाठ!

    दिनांक :29-Jun-2020
|
चार वर्षांत 57 हजार विद्यार्थी घटले    
 2017-18 सत्रात सर्वाधिक घट
नागपूर, 
राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असून मागील चार वर्षांत राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमातून 57 हजार 641 विद्यार्थी घटले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एमबीए, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, पॉलिटेक्निक, एमसीए आणि अप्लाईड आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट या विषयांचा समावेश असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयात गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ झाली. यामध्ये व्यवस्थापन शाखेची 367 महाविद्यालये असून त्यात 52 हजार 127 जागांचा समावेश आहे.college_1  H x


 
अभियांत्रिकी शाखेत (पॉलिटेक्निक, एम. टेक) 711 महाविद्यालये असून त्यात 2 लाख 70 हजार 967 जागा, आर्किटेक्चरच्या 26 महाविद्यालयांत 2 हजार 66, फार्मसी अभ्यासक्रमात 551 महाविद्यालयांमध्ये 51 हजार 737, तर हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील 17 महाविद्यालयांत 1 हजार 272 जागांचा समावेश आहे. मात्र, मागील तीन वर्षांत अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. परिणामी राज्यातील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांची संख्या सातत्याने वाढली आहे. याचाच फटका प्रवेशाला बसला असून राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये सातत्याने घट दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, राज्यात मागील चार वर्षांत 57 हजार 641 विद्यार्थ्यांचे प्रवेश घटले. 2017-18 या वर्षात 22 हजार 486, 2018-19 या वर्षात 20586, तर 2019-20 या वर्षात 14569 अशी घट झाली आहे. यामध्ये 2017-18 या वर्षात सर्वाधिक विद्यार्थ्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.
 
आजघडीला अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा असताना गेल्या तीन वर्षांपासून फार्मसी अभ्यासक्रमात तर एका वर्षापासून व्यवस्थापन अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. 2016-17 ते 2019-20 या कालावधीत फार्मसी अभ्यासक्रमात जवळपास 15 हजारांनी प्रवेश वाढले असून व्यवस्थान अभ्यासक्रमात अडीच हजार विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.
चार वर्षांमधील प्रवेशांची आकडेवारी
वर्ष प्रवेश
2016-17 443347
2017-18 420861
2018-19 400275
2019-20 385706