स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत का नाही ?

    दिनांक :29-Jun-2020
|
देवेंद्र फडणवीस यांची विचारणा
अकोला, 
कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारने राज्य सरकारला भरीव मदत केली आहे. असे असताना स्थानिक स्वराज्य संस्थांना आरोग्य विषयक कामासाठी राज्य सरकारने मदत करण्याची गरज होती. पण, अद्यापपर्यंत कुठलिही मदत स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य सरकारने केली नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था या कोरोना संकटात जनतेला दिलासा देण्यात सक्षम ठरत नसल्याचा दावा माजी मुख्यमंत्री, भाजपा नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला आहे. ते येथे कोरोना रुग्णांची स्थिती व प्रशासनाच्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.
संपूर्ण देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. त्याच बरोबर मृत्यूची टक्केवारी देखील राज्यात अधिक आहे. अकोल्याचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय तयार आहे. पदमान्यता नसल्याने ते सुरु झाले नाही. मी स्वतः मुख्यमंत्री व मुख्य सचिवांसोबत चर्चा करुन पदमान्यता द्यावी यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन त्यांनी दिले.फडणवीस यांनी आज पीकेव्ही क्वारंटाईन सेंटरला भेट दिली. त्या ठिकाणच्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. त्याच प्रमाणे मेडिकल कॉलेजला भेट दिली. प्रशासनाने एक अहवालही त्यांना सादर केला.

akola _1  H x W 
 
 
राज्यात कोरोना संकटात वेगवेगळ्या संस्था काम करत आहेत.त्यांना आवश्यक तो निधी दिला पाहिजे. महापालिकेसारख्या संस्था आहे. त्यांना निधी दिला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली. राज्य शासनाकडे आरोग्याची जबाबदारी आहे. कुठल्याही महापालिकेला अनुदान राज्य शासनाने दिले नाही. अकोल्यात खासदार व राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यामुळे 36 व्हेंटिलेटर मिळाले पण, राज्यातून काही मदत मिळाली नाही. मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. अकोल्यात 15 टक्के इन्फेक्शन आहे. त्यामुळे टेस्टिंग वाढविण्याची गरज आहे.आपण राज्य शासनापर्यंत या गोष्टी पोहचविणार असल्याचे फडणवीस म्हणाले. या पत्रकार परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री खा. संजय धोत्रे, आ.गोवर्धन शर्मा, आ.रणजित पाटील, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर, आ. राजेंद्र पाटणी, भाजपा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात, प्रसिध्दी प्रमुख गिरीश जोशी आदींची उपस्थिती होती.