कॉंग्रेसचा बिनपैशांचा तमाशा!

    दिनांक :30-Jun-2020
|
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष असलेल्या राहुल गांधी यांना झालेतरी काय, असा प्रश्न देशवासीयांनाच नाही, तर कॉंग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही पडला आहे. गांधी घराण्यात जन्म घेतला, याशिवाय स्वत:चे कोणतेही कर्तृत्व नसताना, राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुटून पडत आहेत. लडाखला लागून असलेल्या सीमेवर गेल्या काही दिवसांत चिनी सैनिकांशी झालेल्या झटापटीत आपले 20 जवान हुतात्मा झाले. लडाखमध्ये भारतीय भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍यांना आपल्या जवानांनी चोख उत्तर दिले, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’मध्ये म्हटले. मोदी यांची ‘मन की बात’ ही फक्त त्यांची नाही, तर देशातील कोट्यवधी नागरिकांची ‘जन की बात’ आहे. राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्ष नसला, तरी देशाची जनता संकटाच्या या प्रसंगात सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.

rahul gandhi1_1 &nbs
आपल्या जवानांच्या बलिदानासाठी चीनला आरोपीच्या िंपजर्‍यात उभे करण्याऐवजी, राहुल गांधी आपले डोके गहाण ठेवून मोदींवर हल्ला चढवत आहेत. पंतप्रधान मोदी चीनला खडसावत असताना, राहुल गांधी कारण नसताना मोदींसमोरील अडचणी वाढवत आहेत. राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून मिळालेल्या देणगीमुळे तर हे होत नाही, अशी शंका घ्यायला जागा आहे. विरोधी पक्षांचे काम सरकारवर टीका करणे असते, याबाबत शंका घेणे नव्हे. सरकारवर कधी आणि कशी टीका करायची, याचे तारतम्य विरोधी पक्षाने आणि त्याच्या नेत्याने ठेवायचे असते. देशांतर्गत मुद्यावर राजकारण करताना विरोधी पक्षाने आणि त्याच्या नेत्याने सरकारवर टीका करणे समजण्यासारखे आहे. पण, जेव्हा देशाच्या सुरक्षेचा, सार्वभौमत्वाचा तसेच एकता आणि अखंडतेचा मुद्दा येतो, तेव्हा शंभर आणि पाच नाही, तर एकशेपाच मिळून मुकाबला करायचा असतो. पण, राहुल गांधी आणि तारतम्य, शहाणपणा तसेच प्रगल्भता यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही! तसे असते तर चीनसोबतच्या संकटाच्या वेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली नसती. आधी चीनसोबतच्या तणावावर राहुल गांधी यांनी ट्विटरवर प्रश्न उपस्थित केले. नंतर मोदी यांचा उल्लेख ‘सरेंडर मोदी’ असा करत, राहुल गांधी यांनी आपल्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे दाखवून दिले आहे. राहुल गांधींच्या मनात काही शंका-कुशंका होत्या, तर त्यांनी पंतप्रधान मोदी वा गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करत आपल्या शंकांचे समाधान करून घ्यायला हवे होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आपले मुद्दे उपस्थित करत, सरकारला त्याचे उत्तर देण्यास भाग पाडायला हवे होते. पण, संसदीय नियम, प्रथा आणि परंपरा याची माहिती नसलेल्या आणि संसदीय कौशल्याचा पूर्णपणे अभाव असलेल्या राहुल गांधी यांनी ‘उचलली जीभ लावली टाळूला!’ याप्रमाणे मोदींवर हल्ला चढवायला सुरुवात केली. मोदींवर हल्ला चढवताना राहुल गांधी यांनी आपली राजकीय समज आणि अनुभव तसेच आपले वय याचाही विचार केला नाही.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात चीनने आपली 45 हजार चौरस किलामीटर भूमी गिळंकृत केली. पण, त्याची कोणतीही खंत कधी नेहरूंना आणि त्यांचे राजकीय उत्तराधिकारी झालेल्या गांधी घराण्यातील कुणा नेत्यालाही नंतर कधी वाटली नाही. आज राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री श्रीमती सोनिया गांधी विद्वतेचा मोठा आव आणत, चीनच्या ताब्यातील जमीन परत कशी आणि केव्हा मिळवणार, असा प्रश्न मोदी सरकारला विचारत आहेत. हा प्रकार म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ असाच म्हणावा लागेल! त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांना खडसावले आहे. चीनसोबतच्या सर्व मुद्यांवर संसदेत चर्चा करण्याची आमची तयारी आहे, अगदी 1962 पासूनच्या सर्व मुद्यांवर चर्चा करायला आम्ही तयार आहे, चला, दोन-दोन हात होऊन जाऊ द्या, असे अमित शाह यांनी दिलेले आव्हान आता राहुल गांधींनी िंहमत असेल तर स्वीकारून दाखवावे. तिबेटच्या जमिनीवर गवताचे पातेही उगवत नाही, म्हणजे ती जमीन आपल्यासाठी कोणत्याही उपयोगाची नाही, असे सांगत चीनने गिळंकृत केलेल्या जमिनीचे नेहरू यांनी संसदेत अप्रत्यक्षपणे समर्थन केले होते. त्यावर नेहरूंच्या डोक्यावर नसलेल्या केसांकडे एका विरोधी पक्षनेत्याने त्यांचे लक्ष वेधले होते. म्हणजे ज्या डोक्यावर केसही उगवत नाही, ते डोकेही काही कामाचे नाही, असे या नेत्याला म्हणायचे होते. यावर नेहरू काय ते समजून गेले होते. आज त्याच नेहरूंचे पणतू, आपण किती हुशार असल्याचे प्रदर्शन देशवासीयांसमोर करत आहेत, तेव्हा हसावे की रडावे ते समजत नाही. तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चीनच्या मुद्यावर मोदी सरकारची पाठराखण करत, राहुल गांधी यांना त्यांची जागा दाखवली आहे. चीनच्या कथित घुसखोरीसाठी संरक्षण मंत्रालयाला पर्यायाने सरकारला दोष देणे योग्य नाही, असे पवार म्हणाले. राहुल गांधींचे जेवढे वय आहे, तेवढी पवारांची राजकीय कारकीर्द आहे. देशाचे संरक्षणमंत्रिपदही पवारांनी भूषवले आहे, त्यामुळेच पवार म्हणतात, त्याला निश्चितच महत्त्व आहे. कधीकाळी शरद पवार कॉंग्रेसमध्येच होते. पण, कोणताही त्याग न करता त्यागमूर्ती बनलेल्या श्रीमती सोनिया गांधींचा राजकीय वकूब पाहून त्यांनी कॉंग्रेसचा त्याग करण्यातच आपले भले मानले. किमान चीनच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका करायच्या आधी राहुल गांधी यांनी पवारांचा सल्ला घ्यायला हरकत नव्हती.
काहीच समजत नसताना, आपल्याला खूप काही समजत असल्याचा आव आणणारा राहुल गांधी यांचा स्वभाव त्यांना स्वत:ला आणि कॉंग्रेस पक्षालाही वारंवार अडचणीत आणत असतो. पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवण्याच्या राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळे कॉंग्रेस पक्षातही नाराजी आहे. राहुल गांधी यांनी थेट मोदींवर टीका न करता सरकारवर टीका करावी, अशी कॉंग्रेस पक्षातील काही समजदार नेत्यांची भूमिका आहे, जी योग्य आहे. अशीच भूमिका कधीकाळी राहुल गांधी यांचे निकटवर्ती असलेल्या मििंलद देवरा यांनी घेतली आहे. पण, राहुल गांधी यांना हे सांगायचे कुणी? चीनसोबतच्या संकटाचा सगळ्यांनी एकत्र होत सामना करण्याची भूमिका घेत देवरा यांनी, ‘मांजराच्या गळ्‌यात घंटा’ बांधण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसते. देवरा यांच्यासारखे अनेक समजदार नेतेही कॉंग्रेस पक्षात आहेत, पण गांधी घराण्याची चाटुगिरी करणार्‍यांसमोर हे नेते अल्पमतात आहेत. देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये कुणाचे नाव घेतले नसले, तरी त्यांचा इशारा राहुल गांधींकडे आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. एकप्रकारे देवरा यांनी राहुल गांधी आणि कॉंग्रेसला घरचा अहेर केला आहे! मुळात राहुल गांधी हे कॉंग्रेससाठी ‘असून अडचण नसून खोळंबा’ आहे. राहुल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाचे जेवढे नुकसान केले, तेवढे याआधी कुणी केले नसेल आणि पुढेही कुणी करू शकणार नाही. कारण, आणखी काही वर्षांनी कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्वच राहणार नाही. राहुल गांधींमुळे आतापर्यंत कॉंग्रेस पक्षाचे झालेले नुकसान कमी की काय, म्हणून आता पुन्हा त्यांच्याकडे कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व सोपवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी तशी मागणी केली. त्यामुळे त्यांचे कट्‌टर विरोधक असलेल्या उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनाही तशीच मागणी करावी लागली. राहुल गांधींकडे कॉंग्रेसचे अध्यक्षपद आल्यानंतर कॉंग्रेस पक्षाचा किती फायदा होईल, हे सांगता येत नाही. मात्र, मोदी सरकारचा आणि भाजपाचा मात्र खूप फायदा होणार आहे. राहुल गांधी हे कॉंग्रेसच्या दृष्टीने अॅसेट कधी सिद्ध झाले नाहीत आणि होणारही नाहीत. पण, भाजपासाठी मात्र ते अॅसेट ठरले आहेत. कॉंग्रेसला सत्तेवर आणण्याचे नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे स्वप्न राहुल गांधी पूर्ण करू शकतील, असे वाटत नाही. पण, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेस विसर्जित करण्याचे जे स्वप्न महात्मा गांधी यांनी पाहिले होते, ते स्वप्न राहुल गांधी आपल्या कर्तृत्वाने पूर्ण करतील, याबाबत कुणाच्या मनात शंका नाही!