निवृत्तिवेतनधारकांना करातून सूट देण्यास हरकत काय?

    दिनांक :26-Jul-2020
|
- डॉ. वाय. मोहितकुमार राव
भारत हा तरुणांचा देश असल्याचे मानले जाते. पण, त्याचवेळी 60 पेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे, ही बाबही ध्यानात घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा काळ आहे. प्रकोप फार वाढला आहे. लहान मुलांसोबतच ज्येष्ठांनाही कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे ज्येष्ठांनी स्वत:ची काळजी घेणे अभिप्रेत आहेच, कुटुंबातील सदस्यांनीही ज्येष्ठांची काळजी घेणे अपरिहार्य आहे. ज्येष्ठांच्या उत्पन्नाची साधनं अगदीच मर्यादित असतात. बहुतांश लोक हे त्यांना मिळणारी पेन्शन, संचितावर मिळणारे व्याज यावरच गुजराण करीत असतात. अनेकांकडे तर पेन्शन हा एकमेव उपाय असतो. महागाई झपाट्याने वाढते आहे, वैद्यकीय उपचारांचा खर्च डोईजड होतोय आणि मिळणार्‍या पेन्शनमध्ये फार वाढ होत नाही. नोकरी करत असताना नियमित मिळणार्‍या वेतनातून जी काही थोडीफार बचत केली जाते, त्याच आधारे साठीनंतरचे, निवृत्तीनंतरचे आयुष्य जगण्याचा प्रत्येकाचा मानस असतो. नोकरीत असताना 30 ते 35 वर्षे आपण सरकारला विविध प्रकारचे कर देत असतो. आयकर असेल, व्यवसाय कर असेल, सेवा कर असेल असे कितीतरी कर आपण देत असतो. खरे तर राष्ट्राप्रति हे मोठे योगदान मानले पाहिजे. एखादी व्यक्ती जर 30-35 वर्षे नियमित योगदान देते आहे, तर मग तिच्या आयुष्याच्या उत्तरार्धात कुठलाही कर द्यावा लागू नये, अशी अपेक्षा करण्यात गैर काय? ज्यांच्याकडे मिळकत भरपूर आहे आणि सरकारच्या तिजोरीत कर भरण्याची इच्छा आहे, त्या ज्येष्ठांनी स्वत:हून कर भरला तर आनंदच आहे. पण, शक्यतो ज्येष्ठांना यातून वगळले तर देशभरातील ज्येष्ठांना मोठाच दिलासा मिळेल. समाजाने आणि सरकारने याचा जरूर विचार केला पाहिजे.
 
 
Senior_1  H x W
 
ज्येष्ठांना परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी एकटे सोडले जाऊ नये. परंतु, अनकेदा आपणच ज्येष्ठांची काळजी घेत नाही, सरकारही लक्ष देऊ शकत नाही, ही बाब िंचता वाढविणारी आहे. गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात जी आकडेवारी समोर आली आहे, तीसुद्धा िंचता करायला लावणारी आहे. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांची संख्या आता 8.6 टक्के एवढी झाली आहे. भारत सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाने ही आकडेवारी जारी केली आहे. आपल्या देशात जगण्याचे सरासरी वय हे जवळपास 70 वर्षे आहे. त्यामुळे साठीनंतरचे ज्येष्ठांचे आयुष्य हे अतिशय सुकर असले पाहिजे. जगण्यासाठी त्यांना कुठलाच संघर्ष करावा लागू नये. कसलीही भीती वा  चिंता  सतावू नये, ही अपेक्षा तशी रास्तच म्हटली पाहिजे. आपल्याकडे ज्या प्रमाणात वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे, तीही चिंताजनक आहे. म्हातार्‍या आईवडिलांचा सांभाळ न करता त्यांना एकाकी जीवन जगायला भाग पाडणारे महाभाग समाजात कमी नाहीत. असे एकाकी जीवन जगण्याची वेळ ज्यांच्यावर येते, त्यांच्या पदरी थोडा पैसा असेल तर त्यांचे पुढील आयुष्य थोडे सुकर होऊ शकते. आधुनिकीकरणामुळे आपल्याकडची जी सामाजिक स्थिती आहे, ती लक्षात घेता ज्येष्ठांची वाढती संख्या हे भविष्याच्या दृष्टीने एक आव्हान मानले जाते. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे समाजात ज्येष्ठांची जी अवस्था झाली आहे, ती कोणापासूनही लपून राहिलेली नाही.
 
 
ज्येष्ठांची संख्या फक्त भारतातच वाढते आहे असे नाही. संपूर्ण जगात वाढीचा कल दिसतो आहे. वाढलेल्या वयातील लोकांना अनेक समस्या सतावत असतात. म्हातारपणी कमाईचे साधन नसते. साठीपर्यंत केलेल्या कमाईतून केलेल्या बचतीवर जे व्याज मिळते, त्यातून चरितार्थ कसा चालवायचा, असा प्रश्न अनेक ज्येष्ठांना सतावत असतो. स्वत:च्या प्रकृतीची काळजी आहे, औषधपाणी आहे, अन्य सामाजिक प्रश्न आहेत. उतारवयात समाजात काम करण्याची संधी मिळेलच असे नाही. काम करण्याची संधी मिळाली नाही तर ओळखही मिळत नाही. त्याचप्रमाणे, कल्पकता असूनही काही नवीन करण्याची संधी मिळाली नाही तर फावल्या वेळेत करायचे काय, हाही प्रश्नच आहे. ज्येष्ठांसाठी जशी ही समस्या आहे, तशीच ती समाजासाठीही आहे. ज्येष्ठांची काळजी कशी घ्यायची, जगण्यातला आनंद त्यांना घेता यावा यासाठी काय केले पाहिजे, ज्येष्ठांची सुरक्षा कशी केली पाहिजे, हे आपल्या समाजापुढील सगळ्यात महत्त्वाचे अन िंचता करायला लावणारे मुद्दे आहेत. मूळ मुद्दा हा उत्पन्नाचाच आहे. उत्पन्नाची साधनंच उपलब्ध नाहीत, पेन्शन हा एकमेव आधार आहे आणि पेन्शनही पुरेशी नाही, अशा परिस्थितीत ज्येष्ठांनी करायचे तरी काय? समाज आणि सरकारने ठरवले तर ज्येष्ठांना दिलासा देता येऊ शकतो. सर्व प्रकारच्या करांमधून ज्येष्ठांना सूट दिली तर आर्थिक प्रश्न निश्चितच मार्गी लागू शकतो.
 
 
ब्रिटन आणि अमेरिकेतून नुकतीच ज्येष्ठांबाबत एक माहिती समोर आली आहे. त्यानुसार या दोन्ही देशांमध्ये ज्येष्ठांची संख्या झपाट्याने वाढते आहे. या दोनच नव्हे तर जगातल्या सगळ्याच संपन्न देशांमध्येही ज्येष्ठांची संख्या वेगाने वाढते आहे. ब्रिटन-अमेरिकेतून जी माहिती समोर आली आहे, ती नीट वाचली तर 2050 साली 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांची संख्या दुप्पट होणार आहे, असे लक्षात येईल. जगात 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांची संख्या आजच 4 टक्के आहे. 2050 पर्यंत ही संख्या दहा टक्के होईल, असा अंदाज आहे. पूर्वीच्या तुलनेत आज आरोग्य सुविधा दर्जेदार आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढले आहे. त्यामुळे सगळ्याच देशांमध्ये ज्येष्ठांची संख्या वाढली आहे. पण, या सगळ्या ज्येष्ठांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी जडल्या असल्याने स्वस्थ, सुरक्षित जीवन कसे जगावे, हा मोठाच प्रश्न आहे. अनेक ज्येष्ठांना गंभीर आजार झाले आहेत. पण, सगळ्यात गंभीर आजार आहे आणि तो म्हणजे अल्झायमरचा. या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या शरीराचा कोणता तरी एक भाग 24 तास थरथरत असतो. संपूर्ण जगात हा आजार आहे आणि त्यावर अजूनतरी प्रभावी औषधोपचार सापडलेला नाही. ही काळजी वाढविणारी बाब आहे.
 
 
आपल्याकडे सामाजिक-आर्थिक परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. समाजात ज्येष्ठांना जे आदराचे स्थान यापूर्वी होते, ते तेवढे राहिले नाही. ज्येष्ठांशी बोलतानाची आपली भाषा बदलली आहे. ज्येष्ठांनी त्यांच्या अनुभवातून एखादा सल्ला दिला तर त्यांची टिंगलटवाळी करण्यासही आपण मागेपुढे पाहात नाही. काही अपवाद जरूर आहेत. पण, एकूण परिस्थितीचा विचार केला तर विषय चिंतेचाच आहे. आज अनेक ज्येष्ठांकडे पैसाअडका आहे, मोठे घर आहे. पण, त्यांच्याकडे लक्ष देणारे कोणी नाही. त्यांची स्वत:ची मुलंही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. ज्येष्ठांप्रति आपले काही कर्तव्य आहे, याचा सोईस्कर विसरही अनेकांना पडल्याने त्यांच्या घरातील ज्येष्ठांवर दुर्लक्षित, असुरक्षित, असहाय जीवन जगण्याची वेळ आली आहे. आपण आपली मुलं लहान असतानापासून त्यांच्यावरील संस्कारांचा पाया मजबूत करतो का, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आज जे तरुण संसारात आहेत, त्यांनी पुढल्या काळासाठीची योजना आतापासूनच करून ठेवली पाहिजे. अन्यथा, आपण आज आपल्या घरातील ज्येष्ठांची जी अवस्था केली, तीच आपली उद्या होईल, याची खात्रीच बाळगली पाहिजे.
 
 
ज्येष्ठांच्या आपल्याकडून फार अपेक्षाही नसतात. त्यांना पैशांचा वा अन्य कशाचा मोह नसतो. त्यांना हवे असते कुटुंबीयांचे प्रेम, जिव्हाळा. दिवसातून एकदोन वेळा तुम्ही त्यांची आस्थेने विचारपूस जरी केली तरी त्यांना बरे वाटते. त्यांची अर्धी प्रकृती तर तशीच बरी होते. आपल्याला विचारणारे कोणी आहे, आपली काळजी घेणारे कोणी आहे, ही भावनाच त्यांना सुखावून जाते. बाहेर जाताना आपण त्यांना सांगून गेलो, किती वेळात परत येणार हे त्यांना सांगितले, तर त्यांचा सन्मान झाला, असे त्यांना वाटते. दुर्लक्षित असल्याची भावना त्यांच्या मनात घर करत नाही. एवढे जरी कुटुंबातील सदस्यांनी ज्येष्ठांसाठी केले तरी मोठा प्रश्न सुटू शकतो. कौटुंबिक पातळीवर घरातल्या सदस्यांनी हा प्रश्न सोडवावा आणि सरकारने करांमधून सूट देऊन दिलासा द्यावा. एवढे झाले तरी ज्येष्ठांचे जीवन आनंदी बनू शकते.
 
 
आपल्या देशात सरकारची इच्छा असूनही सरकार आरोग्यविषयक सोई सुविधा पुरविण्याकडे फार लक्ष देऊ शकत नाही. आपल्याकडे गावखेड्यांमध्ये तर आरोग्यविषयक सोईसुविधा नसल्यात जमा आहेत. या गंभीर समस्येकडे राज्य सरकारे, केंद्र सरकार आणि संपूर्ण समाजाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आपणही एक दिवस म्हातारे होणार आहोत आणि आपल्याकडे त्यावेळी कोणी लक्ष दिले नाही तर आपली अवस्था काय होईल, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. चीनमध्ये ज्येष्ठ नागरिक जसे दुर्लक्षाचे बळी ठरले आहेत, तसे भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत होऊ शकते, अशी भीती आजच सतावू लागली आहे. आज आमचा देश तरुणांचा म्हणून ओळखला जातो हे ठीक आहे. पण, भविष्यात तो दुर्लक्षित म्हातार्‍यांचा होणार नाही याची काळजी आतापासूनच घेतली जाणे गरजेचे ठरते.
 
9545847799