वर्ल्ड कप पात्रता फेरीला गुरुवारपासून सुरुवात

    दिनांक :29-Jul-2020
|
कॅनबेरा,
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी वर्ल्ड सुपर लीगची घोषणा केली. आयर्लंड आणि वर्ल्ड कप विजेते इंग्लंड यांच्यात ३० जुलैपासून खेळवण्यात येणाऱ्या क्रिकेट मालिकेने या लीगची सुरुवात होणार आहे. २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रता फेरीतील ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

england vs ireland_1  
 
इंग्लंडचा संघ आयर्लंडविरूद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. याच मालिकेच्या माध्यमातून क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीगची सुरुवात होणार आहे. या लीग अंतर्गत खेळवण्यात येणारे सामने हे २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील पात्रता सामने असतील. यजमान भारत आणि सुपर लीगमधील अव्वल सात संघ अशा आठ संघांना वर्ल्ड कप स्पर्धेत थेट स्थान मिळेल.
आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेले १२ संघ आणि विश्व क्रिकेट सुपर लीग २०१५-१७ चे विजेते नेदरलॅन्डस् असे १३ संघ या नव्या सुपर लीगमध्ये स्पर्धेत खेळतील. प्रत्येक संघ घरच्या मैदानावर आणि परदेशात ४-४ वन डे मालिका खेळेल. प्रत्येक वन डे मालिका ही तीन सामन्यांचीच असेल. या स्पर्धेत जे संघ थेट पात्र ठरणार नाही, त्यांना पात्रता फेरी २०२३ मध्ये पाच सहकारी संघांसह खेळून स्थान निश्चित करावे लागेल. यातून दोन संघ निवडले जातील आणि भारतात १० संघांमध्ये मूळ विश्वचषक स्पर्धा खेळवली जाईल.
 
इंग्लंड-आयर्लंड वन डे मालिकेचे वेळापत्रक
30 जुलै - पहिला वन डे - साऊदॅम्प्टन
01 ऑगस्ट - दुसरा वन डे - साऊदॅम्प्टन
04 ऑगस्ट - तिसरा वन डे - साऊदॅम्प्टन