100 वर्षांचे झाले फायटर पायलट दलीपिंसग मजीठिया

    दिनांक :31-Jul-2020
|
- हवाईदल प्रमुखांनी दिल्या शुभकामना
- सर्वात जुने योद्धे
नैनीताल :
भारतीय हवाई दलाचे सर्वात जुने फायटर पायलट स्क्वाड्रन लीडर दलीपिंसग मजीठिया 100 वर्षांचे झाले. या धाडसी, जिगरबाज आणि आकाशात मुक्तसंचार करून शत्रूला धडकी भरविणार्‍या वायुपुत्राला उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी शुभकामना दिल्या. भारतीय हवाईदलाचे प्रमुख एयर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी दलीपिंसग यांना आयुष्याचे शतक गाठल्याबद्दल विशेष शुभेच्छा दिल्या. जेव्हा 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच वर्षी ते सेवानिवृत्त झाले होते.
 
 
DS Majithiya_1  
 
दलीपिंसग मजीठिया यांनी शंभरी पार केल्याबद्दल भारतीय हवाई दलाने विशेष टि्‌वट केले आहे. सर्वात जुने फायटर पायलट असल्याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे, असे या टि्‌वटमध्ये म्हटले आहे. एयर चीफ मार्शल भदौरिया यांनीही सर्व वायुयोद्धांच्या वतीने मजीठिया यांचा गौरव करतानाच त्यांचा एक व्हिडीओ देखील सामायिक केला.
 
 
फायटर मजिठिया यांचा वाढदिवस कोरोना मार्गदर्शक तत्त्वे पाळून दिल्लीस्थित जौनापूर फार्म हाऊसवर अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. कुटुंबीयांनी खास केक पाठविला होता. तसेच मित्रांनी देखील विमानाच्या आकाराचा केक पाठविला होता. नैनीताल राजभवन गोल्फ क्लबचे सचिव व सेवानिवृत्त कर्नल हरीश साह यांनी क्लबच्या अध्यक्ष व राज्यपाल बेबी रानी मौर्य यांच्या वतीने मजीठिया यांना शुभेच्छा पत्र पाठविले.
 
 
नैनीताल निवासी डी. एस. मजीठिया यांनी दुसर्‍या महायुद्धात अतुलनीय पराक्रम गाजविला. ते देशासाठीही अनेक लढाया लढले. मात्र, स्थानिक नैनितालचे नागरिक त्यांना उत्कृष्ट गोल्फ खेळाडू म्हणून अधिक ओळखतात. गेल्या वर्षीपासून ते दिल्लीला राहायला आले. मात्र, आज आयुष्याचे शतक पार केल्यानंतरही त्यांनी गोल्फ खेळणे सोडलेले नाही तसेच त्यांचा दैनंदिन सरावही कधीच चुकला नाही.