कोरोनाग्रस्त उद्योगांसाठी लवकरच विशेष पॅकेज

    दिनांक :31-Jul-2020
|
- आता 48 तासांत उद्योगांना परवानगी : सुभाष देसाई
- महापरवाना व महाजॉब्स उपक्रम सुरू
मुंबई, 
कोरोनामुळे ज्या उद्योजकांचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी आम्ही एक विशेष पॅकेज तयार केले आहे. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर अधिकृत घोषणा करू. आम्ही उद्योगवाढीसाठी देखील काही योजना आखल्या आहेत. लवकरच त्याची अंमलबजावणी करू, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ते एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलत होते. उद्योग विभागाच्या महापरवाना योजनेद्वारा 48 तासात उद्योगांसाठी परवानगी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
 

Subhash Desai_1 &nbs
सुभाष देसाई पुढे म्हणाले, एका बाजूला कोरोनाचे व्यवस्थापन करावे लागणार आहे तर दुसर्‍या बाजूला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आम्ही काही कंपन्यांसोबत करार केले आहेत, ते फक्त कागदावर राहणार नाहीत. अनेक विदेशी कंपन्यांना महाराष्ट्रात यायचे आहे. त्यांच्याशी करार करून उद्योगवाढीसाठी प्रयत्न केले जातील. सगळ्या बाजारपेठा खुल्या करा, अशी मागणी व्यापारी करीत आहेत. त्यांची ही मागणी चुकीची नाही. मात्र, कोरोनाचे संकट गंभीर असले तरी उद्योग सुरू करावे लागतील, असेही उद्योगमंत्री म्हणाले.
 
 
चांगल्या सुविधा
उद्योग मंत्रालयाने उद्योगांना चालना देण्यासाठी चांगल्या सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. एमआयडीसीने उद्योजकांना तयार शेड देण्याची तयारी केली आहे. नवीन गुंतवणूकदारांना ‘उद्योगमित्र’ उपलब्ध करून देणार आहोत. महापरवाना ही योजना सुरू केली आहे. 48 तासात उद्योगांसाठी परवानगी देण्यात येईल, म्हणजे तत्काळ त्यांना उत्पादन घेता येऊ शकेल. महाजॉब्स हा देखील चांगला उपक्रम आपण सुरू असून याला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही देसाई म्हणाले.
 
 
‘भूमिपुत्रांना रोजगार’ हा आमच्या सरकारचा मूळ कार्यक्रम आहे. ‘रहिवासी दाखला हवा’ अशीच अट महाराष्ट्र शासनाने महाजॉब्समध्ये टाकली आहे. याद्वारे स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिले जाणार आहे. परप्रांतीय मजूर येत नसतील तर स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या, अशा सूचना कंपन्यांना दिल्या आहेत, असे देसाई म्हणाले.
 
 
राज ठाकरे यांच्या टीकेवर बोलताना देसाई म्हणाले की, ‘शुभ बोल रे नार्‍या’ या म्हणीप्रमाणे काम चांगले होत असेल तर चांगल्या शुभेच्छा द्या. चांगल्या निर्णयांचे स्वागत करा. अडचणी सगळीकडे आहेत. देशातील सगळी सरकारे अडचणीत आहेत. त्यामुळे टीका करण्याऐवजी सूचना करा, सल्ला द्या, असे त्यांनी म्हटले आहे.
 
 
भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्रित येण्याबाबत ते म्हणाले की, आता ती वेळ निघून गेली आहे. जेव्हा आम्हाला सांभाळण्याची गरज होती त्यावेळी त्यांनी झिडकारले. जुन्या मित्रांना त्यांचा मार्ग आहे. त्यांनी त्या मार्गाने जावे, त्यांना शुभेच्छा. एकटे लढण्याच्या धोरणाला आमच्या शुभेच्छा आहेत, असे सुभाष देसाई म्हणाले.