शहरात टाळेबंदी नाहीच...!

    दिनांक :31-Jul-2020
|
-लोकप्रतिनिधींची भूमिका
नागपूर,
टाळेबंदीमुळे जनता आधीच हवालदिल झाली आहे. टाळेबंदी लावावी, अशी मानसिकता या शहरातील नागरिकांची नाही. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींचीसुद्धा ही मानसिकता असून जर प्रशासनाने जबरीने टाळेबंदी लादली तर लोकांसोबत आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

lok nmc_1  H x  
 
नागपुरात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता टाळेबंदी लावावा की नाही यावर चर्चा करण्याकरिता महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालय सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला खासदार कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, आ. प्रा. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) श्वेता खेडकर उपस्थित होते.
 
अधिक रुंद रस्त्यावरील दोन्ही बाजुंची दुकाने सुरू शहरात ’मिशन बिगीन अगेन’अंतर्गत बाजारातील दुकाने सम आणि विषम तारखांच्या नियमानुसार सुरू आहेत. परंतु यापुढे 12 मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या मार्गावरील दुकाने दररोज सुरू ठेवण्यात यावेत, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. 9 मीटर अथवा त्याखालील कमी रुंदीच्या मार्गावरील दुकानांसाठी सम-विषम तारखांचा नियम कायम ठेवण्यास त्यांनी सांगितले.
 
अनेक दुकानदारांवर नियमाच्या नावाखाली दंड ठोठावण्यात येत आहे. हा दंड आकारण्याचा निर्णय स्थायी समितीत झाला नाही. त्यामुळे असा बेकायदेशीररीत्या दंड आकारणे तात्काळ बंद करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. मूर्तीकारांवर आर्थिक दंड लावण्याचा त्यांनी विरोध केला. मस्कासाथ मध्ये गर्दी पहता सम-विषम नियम लागू कराव असे ही ते म्हणाले.
बैठक नियमित होणार
टाळेबंदी असो, जनजागृती असो की कोरोनाची परिस्थिती असो, या सर्व विषयांचा आढावा घेण्यासाठी आता यापुढे लोकप्रतिनिधींची नियमित बैठक होईल. पुढील बैठक शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी होईल, असे महापौर संदीप जोशी यांनी जाहीर केले.