डोनाल्ड ट्रम्प यांचे कोरोनामुक्तांना नवे आवाहन

    दिनांक :31-Jul-2020
|
वॉशिंग्टन,
जगभरात कोरोना विषाणूचे थैमान अद्यापही सुरूच आहे. प्रत्येकच देश या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनावर लस विकसित करण्याचेही काम सुरु आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना नवे आवाहन केले आहे. 
 
 
donald trump_1  
 
जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत ४६ लाख २९ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दीड लाखांहून अधिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना रुग्णांना प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी अमेरिकन रेडक्रॉसच्या मुख्यालयाचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले. माझे प्रशासन कोरोना व्हायरसवर उपचार शोधण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आपण कोरोनापासून बरे झाले असल्यास, प्लाझ्मा दान करा. जेणेकरून इतरांचे जीव वाचू शकतील. आपण एकत्रितरित्या या संकटावर मात करू, असे ट्रम्प यावेळी म्हणाले.