भयावह! देशात 24 तासात कोरोनाचे 55 हजार नवे बाधित

    दिनांक :31-Jul-2020
|
- कोरोना संक्रमितांची एकूण संख्या १६ लाखांवर 
नवी दिल्ली,
देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. दररोज बाधितांची नव्याने आढळून येणारी रुग्णसंख्या नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या २४ तासात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे सुमारे ५५ हजार नवे बाधित सापडल्यामुळे देशातील कोरोना संक्रमितांची संख्या १६ लाखांच्या वर पोहोचली आहे. 

desh _1  H x W: 
 
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात कोरोनाच्या ५५ हजार ७९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशातील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या १६ लाख ३८ हजार ८७१ इतकी झाली आहे. तर, ७७९ नव्या मृत्यूंमुळे देशातील कोरोनाबळींची संख्या ३५ हजार ७४७ झाली आहे. सध्या देशात ५ लाख ४५ हजार ३१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १० लाख ५७ हजार ८०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर २.२३ टक्के इतका असून जागतिक स्तरावरील मृत्यूदरापेक्षा तो कमी आहे. 
देशातील ९ राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या 50 हजाराच्या वर गेली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ४ लाख ११ हजार ७९८ संक्रमित आहे. दुसर्‍या स्थानावरील तामिळनाडूतील संक्रमितांची संख्या २ लाख ३९ हजार ९७८ आहे. दिल्ली १ लाख ३४ हजार बाधितांसह देशात तिसर्‍या स्थानावर आहे. आंध्रप्रदेशात १ लाख २० हजार, कर्नाटकात १ लाख १३ हजार, उत्तरप्रदेश ७७ हजार ३३४, गुजरात ६० हजार २८५, पश्चिम बंगालमध्ये ६७ हजार ६९२, तर तेलंगणात ५९ हजार ९०६ संक्रमित आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ११ हजार १४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, २६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ११ हजार ७९८ वर पोहोचली आहे. सध्या राज्यात ९ लाख ०४ हजार १४१ व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत. तर ४० हजार ५४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या एकूण १ लाख ४८ हजार १५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच, राज्यात एका दिवसात ८,८६० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून एकूण २ लाख ४८ हजार ६१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के इतके आहे.