राष्ट्र साधकांची मांदियाळी!

    दिनांक :01-Aug-2020
|
ईशान्य वार्ता
- सुनील किटकरू
आज ईशान्येत शांतता दिसत आहे. सर्व क्षेत्रात प्रगती होत आहे. दहशतवाद थंडावला आहे. यात अनेक कार्यकर्त्यांचा खारीचा वाटा आहे. महाराष्ट्रातूनदेखील मोठ्या संख्येत कार्यकर्ते 1950 पासूनच कार्यरत आहेत. ईशान्य प्रदेशांशी दीर्घकालपर्यंत संपर्क ठेवून सतत कार्यरत अशा मंडळींमध्ये पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांचे नाव घ्यावेच लागेल.
 

Page 4_1  H x W 
 
भव्य देहयष्टीचे पद्मनाभजी मुळचे उडूपी कर्नाटकचे. पुढे मुंबईत स्थायिक झालेत. उच्चशिक्षित पद्मनाभजींनी 1962 च्या चीन आक्रमणानंतर ईशान्येत प्रवास केला. ‘नेफा, नेफा’ तेजपूर ही ठिकाणं, नावे ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं, आपल्याला तर हे काहीच माहीत नाही. तेथील विद्यार्थ्यांशी संपर्क केला. शिक्षणासाठी सातही राज्यांतील विद्यार्थी मुंबई, नागपूर, कानपूर येथे परिवारात ठेवून शिक्षणाची सोय केली. येथूनच My Home India (भारत मेरा घर) ही योजना त्यांनी मित्रांच्या सहयोगाने सुरू केली. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हे दीर्घकालीन पाऊल होते. 1966 ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पद्मनाभजी अध्यक्ष झालेत. 1968 ला आंतर राज्य छात्र जीवन दर्शन (एसईआयएल) हा प्रभावशाली प्रकल्प त्यांनी सुरू केला. एका वर्षी ईशान्येतील विद्यार्थिगण भारतातील विविध राज्यांत फिरतील येथील निसर्ग, इतिहास, संस्कृती अनुभवतील; तर दुसर्‍या वर्षी देशभरातील विद्यार्थी पूर्वांचलातील जीवन संस्कृतीचा अनुभव घेतील. या देवाणघेवाणीतून ‘आम्ही भारतीय’ हा बोध हृदयावर अंकित होईल. आयएनएफसी (इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटर)देखील सुरू करून जनजाती भाषा शिकणे, त्यात साहित्य निर्मिती करणे, असे कार्यक्रम मुंबई येथे राणी मॉ गाइडिन्युल भवनात सुरू केले. 1980 ला भाजपामध्ये प्रवेश केला. राष्ट्रीय सचिव, विशेष प्रभारी ईशान्य भारताची त्यांच्यावर जबाबदारी आली. तो काळ ईशान्येत असा होता की, उमेदवार निवडून येण्याची सुतराम शक्यता नव्हती. आचार्यजी सतत भ्रमंतीवर असत.
 
 
संघ कार्यालयात येत. सहज सतरंजीवर बसत. संध्याकाळी एकत्र एखाद्या कार्यकर्त्यांकडे नाही तर हॉटेलात आम्ही जेवत असू. त्यांचा सत्संग ज्ञानवर्धक व आनंददायी, प्रेरक असे. परिवार असताना त्यांचा खर्च कसा चालतो, असे विचारले असता शेअर बाजारातील बोनस मिळतो. त्यावर व्यवस्थित आर्थिक गणित जमते, असे ते उत्तरले. कार्यकर्त्याने सामाजिक कार्य करताना आर्थिकदृष्ट्या स्थिर असावे. तसेच कोणी कार्यकर्ता निष्क्रिय असेल तरी त्याच्याशी चांगलीच वागणूक ठेवावी. काय सांगता येईल निष्क्रिय व्यक्ती सक्रिय होईल व सक्रियदेखील आयुष्याच्या टप्प्यात निष्क्रिय होऊ शकतो.
 
 
पुढे आचार्यजी 2014 साली नागालॅण्डचे राज्यपाल झाले. योगायोग म्हणजे वेळोवेळी मणिपूर, अरुणाचल, त्रिपुरा, आसाम या राज्यांचादेखील अतिरिक्त भार त्यांना सांभाळावा लागला. ईशान्येतील कार्यकर्त्यांना अत्यानंद झाला. कारण, पद्मनाभजी त्यांच्यातले व राज्यपालांचे ठरावीक, औपचारिक शिष्टाचार पाळण्यातले नव्हते. 31 जुलै 2019 पर्यंत ते राज्यपाल होते. नागालॅण्डसारख्या अशांत व दीर्घ सशस्त्र संघर्षाची पार्श्वभूमी असलेल्या राज्यात त्यांचे येणे लाभदायक ठरले. 2015 चा केंद्र सरकार व नागा दहशतवादी संघटनेबरोबर शांतता करार त्यांच्याच कार्यकाळात झाला.
 
 
सतत सकाळपासून लोकांच्या त्यांना भेटण्यासाठी रांगा लागत. स्वत: आचार्यजी धर्मपत्नी कवितासोबत शाळांना भेट देत. त्यांच्याबरोबर मिड डे मिल घेत. जेणेकरून जेवणाचा दर्जा कळेल. गणित शिक्षक सरकारी शाळेत बरोबर येत नसल्याने कविता आचार्य स्वत: शाळांमध्ये शिकवीत. मुंबईतील उद्योजक, डॉक्टरांना नागालॅण्डमध्ये आणून उद्योग, चिकित्सा क्षेत्रात सेवा प्रदान केली. अशा असंख्य कामाची जंत्री देता येईल. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून ईशान्येतील परिस्थिती, लोकांबद्दल तळमळ व कळकळ प्रकट होत असे. राजभवनात त्यांच्याशी बोलताना त्यांनी म्हटलेले वाक्य अजूनही हृदयात सल करते- ‘‘अरे सुनील, जो तो राजकारणात जावयास पाहतो. येथे पाहा आपण ख्रिश्चन मिशनर्‍यांना बोलतो. परंतु, येथे त्यांनी किती प्रचंड शिक्षण संस्था, दवाखाने उघडलेत, ठाण मांडून बसलेत. आपल्यातले किती जण अशा दुर्गम ठिकाणी कार्य करण्यास तयार आहेत?’’ आज पद्मनाभजी 89 वर्षांचे युवा आहेत.
 
 
मूळचे मुंबईचे सुनील वि. देवधर त्रिपुराच्या भाजपा विजयाने प्रसिद्धीच्या झोतात आले. एम. एस्सी.चे शिक्षण पूर्ण केल्यावर मेघालयात 90 साली संघप्रचारक म्हणून रुजू झालेत. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने ‘भारत मेरा घर’, सेवा भारती शाळा, खासी, जयंतिया यांचे स्थानिक उत्सव साजरे करणे. बोलीभाषेवरील पकड याने लवकरच मेघालयात स्थानिक समाजात संघकार्य रुजवले. 2014 साली भाजपाने मार्क्सवाद्यांच्या बालेकिल्ल्यात देवधरांना पाठविले. भीतिदायक वातावरण तयार करणे व विरोधकांशी असहिष्णू वागणूक यासाठी कम्युनिस्ट प्रसिद्ध आहेत. 2001 साली चार संघकार्यकर्त, प्रचारक मारले गेले होते. कम्युनिस्टांशी दोन हात करण्याची िंहमत सुनीलने दाखविली. ग्रामपातळीवर संघटन उभे केले. पाणी, वीज, रस्ते आदींची दुर्दशा, डबघाईस आलेली आरोग्य सेवा, शिक्षणाची दुरवस्था याविरुद्ध जनआंदोलन उभारले. अनेक कार्यकर्त्यांवर हल्ले झालेत. स्वत: सुनील तीस रक्षक कार्यकर्त्यांसमवेत घेरलेला असायचा. ‘चलो पलटाई’ हा नारा लोकप्रिय झाला. समाजमाध्यमांचादेखील उत्तम उपयोग केला. रेल्वेत कार्यकर्त्यांनी प्रवास करून नरेंद्र मोदी सरकारने केलेली कामाची माहिती प्रवासी लोकांना दिली. त्यांचे संपर्क क्रमांक टिपून समाजमाध्यमाद्वारे समस्या सोडविण्याचा व कम्युनिस्ट सरकार उलटवण्याची मन:स्थिती लोकांची तयार केली. कम्युनिस्टांनी इतके वर्षे जनतेस कसे गरीब केले व ठेवले, हे निदर्शनास आणले आणि निवडणुकीत नेत्रदीपक यश खेचून आणले. सुनीलनेदेखील ‘माय होम इंडिया’ प्रकल्पाचा देशभर विस्तार केला. ईशान्येतील विद्यार्थी, जनतेसाठी टोल फ्री नंबर, आरोग्य सेवा, शिक्षण करीअर मार्गदर्शन देशभर सुरू केले. यासाठी 40 पूर्णकालीन कार्यकर्त काम करतात. ईशान्येतील महत्त्वपूर्ण, उल्लेखनीय कार्य करण्यासाठी वन इंडिया अवार्ड व कर्मयोगी पुरस्कार सुरू केला. घरातून पळून गेलेल्या व बालसदनात राहणार्‍या मुलांसाठी ‘सपनो से अपनोतक’ हा प्रकल्प सुरू केला. आतापर्यंत 1700 मुलांना त्यांच्या पालकापर्यंत पोहचविण्यात आले आहे. खटला चालविण्यासाठी वकिलांना द्यायला पैसे नसल्यामुळे कारागृहात अनेक वर्षे कैदी खितपत पडलेले असतात. अशांसाठी ‘दर्द से हमदर्द’ हा प्रकल्प सुरू केला. अनेक कैद्यांना सहायता करून जीवन जगण्याच्या मार्गी लावले.
 
 
नेहमी मित्रांच्या, कार्यकर्त्यांच्या गराड्यात असणार्‍या सुनीलची स्वतंत्र कार्यशैली आहे. धन व माणसं उभे करण्यात त्याचा हातखंडा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात तरबेज असल्याने त्याचे आज लाखो फॉलोअर्स आहेत. ईशान्येतील कोणीही व्यक्ती दिसल्यास त्यांचाशी ओळख करा, आपल्या घरी सणासुदीला बोलावा याने आपुलकी वाढेल, हे राष्ट्रकार्यच आहे, ही पे्रमाची अनुभूती घेऊनच ही माणसं आपल्या राज्यात राहून भारताची एकात्मता मजबूत करतील, असे सुनीलचे प्रत्येकास आवर्जून सांगणे असते.
 
 
आपल्या नागपूरचे बजाजनगर शाखेचे स्वयंसेवक अशोक वर्णेकर व त्यांच्या धर्मपत्नी अलका वर्णेकर, दोघेही उच्चशिक्षित. एके दिवशी सर्व सोडून आसामच्या पार्वतीपूर नामक गावात येतात आणि तिथलेच होऊन जातात. गेल्या 30 वर्षांपासून या कुटुंंबाचे येथे वास्तव्य आहे. त्यांच्या परिश्रमाची फळं दिसू लागली आहेत.
 
 
आसाम म्हटले की चहाच्या मळ्यांची आठवण येते. परंतु, इथल्या मळ्यात कष्ट करणारी मजूरसंख्या पाच लाखांच्या वर आहे. दोनशे वर्षांपासून ‘सदानी’ भाषक समाज येथे राहतो. भीषण दारिद्र्य, व्यसनाधीनता, शिक्षणाचा अभाव त्यामुळे असलेले मागासलेपण यांच्या चक्रांत अडकलेला हा समाज. हे दाम्पत्य अशा वातावरणात ठाण मांडून बसलेत. हळूहळू गोष्टी, खेळ, गाणी यांच्या माध्यमातून भास्कर संस्कार केंद्र सुरू केले. पहिली ते दहावीपर्यंतची शाळा ‘भास्कर ज्ञानपीठ’ दिमाखाने उभी आहे.
 
 
शाळा आटोपल्यावर अशोकजी विहिरीतून पाणी काढत, तर अलकाजी मुलांना साबण लावून स्नान करवीत. दुपारच्या वेळेस छोटे उद्योग प्रशिक्षण चालत असे. बुक बाईंिंडग, मोत्यांच्या माळा बनविणे, विटा बनविणे, दप्तर तयार करणे व विकणे त्यातून केंद्राची तुटपुंजी व्यवस्था होत असे. आर्थिक विवंचनेत असतानाही हे दोघे मात्र आनंदाने राहत. दुसर्‍याला पत्ता लागत नसे. मुलगा हर्षद आज आयटी इंजिनीअर आहे. मुलगी मधुरा एअर फोर्सला वैमानिक आहे. या दोघांनाही अत्यंत कष्टात रोज 21 किलोमीटर दूर जात स्वत:चे लहानपणी शिक्षण पार पाडावे लागले. साहजिकच त्यांच्यात आईवडिलांप्रमाणे तीव्र सामाजिक संवेदना असल्याने तेही या कार्यात सहभागी आहेत. आज भास्कर संस्कार केंद्रात सुंदर शिवमंदिर आहे. गावातील मुलंच पूजा करतात. पौरोहित्यदेखील शिकलेत. 101 रुपयांत लग्नविधी करवितात. शारीरिक प्रात्याक्षिक, गीता पठन व सर्व प्रकारच्या सेवाकामात मुलं अव्वल आहेत. गावात व्यसनाधीनता कमी झाली. शिकून मुलं सर्वच क्षेत्रात प्रगती करीत आहे. पुष्पा मुंडा एम. कॉम. होऊन भास्कर संस्कार केंद्रात शिक्षक आहेत. शांती मुंडा वकील झाली. विशाल मुंडा बी. ए. झाला. तो सदानी भाषेतील उत्तम कवी आहे. वाईट चालीरीतीला आळा बसला. दुसर्‍याच्या मदतीला धावणे, समाज, राष्ट्रभान आलं. छोटी मुलं खेळता-खेळता डबक्यात पडून मरून जायची. Subhuman अवस्था इथे होती. या दाम्पत्याच्या असीम त्यागानेच येथे ‘उत्थान’ होत आहे. आसपासच्या गावात हे बदलाचे वारे दिसत आहेत. पल्ला लांबचा आहे. शोषित-पीडित समाजाला सन्मानाचे जगणे प्राप्त होत आहे. कमीतकमी गरजा व जास्तीत जास्त तडजोडी हे आमच्या जगण्याचे सूत्र व बांधवांनी दिलेले भरभरून प्रेम हीच आमची जमापुंजी, असे मानणारे हे जोडपे. म्हणून इथली मुलं आता ठामपणे म्हणतात...
 
चारो ओर घना अंधीयारा
पंथहीन है समाज सारा,
पर होगा निश्चित नया सवेरा,
हॉं यही भाग्य हैं मेरा,
हा यही स्वप्न है मेरा...