राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांचे निधन

    दिनांक :01-Aug-2020
|
- सिंगापूरच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
नवी दिल्ली,
माजी समाजवादी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू होते. उत्तर प्रदेशातल्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होती. जुलै २०१६ मध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले. तेव्हापासून ते राजकारणात काहीसे कमी सक्रिय होते. याच वर्षी त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. प्रदीर्घ आजारामुळे त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
 
amar_1  H x W:
 
अमर सिंह हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले होते. समाजवादी पक्षापासून फारकत घेतल्यानंतर ते राजकारणात काहीसे कमी सक्रिय होते. गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ ते आजारी होते. त्याआधी त्यांची जवळीक भाजपासोबत वाढली होती. १९९६ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेल्यापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती. अनेक वर्ष ते समाजवादी पक्षात महत्त्वाच्या भूमिकेत होते. दीर्घकाळ त्यांनी समाजवादी पक्षाचे महासचिव हे पद भुषवलं. त्यावेळी मुलायमसिंग यादव हे अमरसिंग यांच्याच सल्ल्याने कारभार करत असल्याचं म्हटलं जात होतं. नंतर मात्र त्यांच्यात मतभेद होत गेले. समाजवादी पक्षाचा कारभार अखिललेश सिंग यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्यातली दरी वाढतच गेली.
बिग बी अमिताभ बच्चन यांचे आणि त्यांचेही चांगले संबंध होते. मात्र या दोघांमध्ये काही मतभेदही झाले होते. ज्यानंतर यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांची माफीही मागितली होती.