पुनश्च हरि ओम!

    दिनांक :01-Aug-2020
|
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
गेले पाच महिने अगदी घरात कोंबून घेऊन राज्याच्या प्रमुखांनी राज्यातील जनतेला एकप्रकारे वार्‍यावर सोडल्याचे चित्र बघायला मिळाले. त्यामुळे प्रमुखांना समाजमाध्यमांवर मोठ्याप्रमाणात लक्ष्य केले गेले. घरकोंबडा यासारख्या उपमा दिल्या गेल्यानंतरही स्वयंघोषित ‘बेस्ट सीएम’ मात्र, काही केल्या बाहेर पडायला तयार नव्हते. तिकडे राज्य खड्‌ड्यात गेले तरी चालेल, पण मी बाहेर पडणार नाही... अशी कठोर भूमिका घेणार्‍या मुख्यमंत्र्यांनी अखेर पुणे दौर्‍याच्या माध्यमातून कामाचा ‘पुनश्च हरि ओम’ केला म्हणायला हरकत नाही.
 
 
Mumbai Local_1  
 
लोकमान्य टिळकांचा दाखला देत ‘पुनश्च हरी ओम’ म्हणजे पुन्हा नव्याने सुरुवात ‘मिशन बिगिन अगेन’ आपण करत असून, आता प्रत्येक पाऊल जपून टाकायचे असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी ‘अनलॉगची’ घोषणा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून करताना केली होती. आणि त्याचे काटेकोर पालन करण्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी स्वतःला जपून ठेवत केल्याचे दिसले. घोषणा केली त्यावेळी जपून पावलं टाकण्याचा अर्थ अनेकांना समजला नसावा. मात्र, त्यानंतरच्या काळात जपणे म्हणजे काय? हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः कृतीतून दाखवून दिले. म्हणतात ना पहिले स्वतः कृती करा नंतर इतरांना उपदेश करा... त्यामुळेच घरात राहा, सुरक्षित राहा... असा जनतेला संदेश देऊनही जनता आपल्याला ऐकत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी कदाचित स्वतः प्रत्यक्ष कृती करून जनतेला संदेश देण्याचा प्रयत्न केला असावा. मग काय तर, ‘लॉकडॉऊन’ऐवजी ‘मिशन बिगिन अगेन’चा नारा देताना मुख्यमंत्री स्वतःच कधी लॉकडाऊन झाले हे कुणाला कळलेच नाही. काहीही असोत पण आता ते बाहेर पडले असून, त्यांना राज्यातील कोरोनाची भीषणता प्रत्यक्ष पाहायला मिळाली असेल, अशी आशा करायला काही हरकत नाही.
 
 
मुख्यमंत्र्यांच्या घरातून बाहेर न पडण्याच्या कृतीवर राज्यभरातून टीका होत असताना, देशातील हुशार आणि पंतप्रधानपदासाठी पात्र असलेले एकमेव राष्ट्रीय नेतृत्व असलेल्या शरद पवारांनी मुख्यमंत्री हा कॅप्टन असतो आणि कॅप्टनने एकाजागी बसूनच कार्य केले पाहिजे, असे वक्तव्य करून, मुख्यमंत्र्यांच्या या कोरोनासदृष्यस्थितीचा सामना न करता पळ काढण्याच्या केलेल्या कृतीचे समर्थन करत पाठराखण करण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र, समाजमाध्यमातून टीकेचा रोख पवारांकडे वळताच त्यांनी लगेचच घुमजाव करत मुख्यमंत्र्यांनी फिरले पाहिजे, असे सुधारित वक्तव्य करून सावरासावर केली. मग काय कठपुतलीप्रमाणे वर्ल्ड बेस्ट सीएम लागलीच निघालेना पुण्याच्या दिशेने... त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच... कारण महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक 9 मार्च रोजी सुरू झाला. या दिवशी महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे होणार्‍या साथीच्या आजाराची पहिली नोंद पुण्यातूनच झाली. आजघडीला पुण्यात कोरोना संसर्ग सर्वाधिक वाढला आहे. एकट्या जुलै महिन्यात पुणे जिल्ह्यात तब्बल 55 हजार 584 नवे कोरोना बाधित सापडले आहेत. आधीच्या संख्येपेक्षा हा आकडा मोठा आहे. तर ऑगस्टमध्ये ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 30 जून या दिवशी जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 22 हजार 429 एवढी होती. तर 29 जुलैपर्यंत जिल्ह्यातील बाधितांची संख्या 78 हजार 13 एवढी झाली. म्हणजेच एकट्या जुलै महिन्यात जिल्ह्यातील नवीन 55 हजार 584 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. तेव्हापासून आजवर मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे लक्ष नव्हते. पुणे महापालिकेच्या खांद्यावर संपूर्ण जबाबदारी टाकून राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी पुण्याला एकप्रकारे वार्‍यावर सोडल्याचे चित्र होते. एवढेच नव्हे तर, महापालिकेने परिस्थिती हाताळावी ही अपेक्षा करणे चुकीचे नसले तरी, त्यासाठी लागणारा निधीसुद्धा राज्य सरकारने पुणे महापालिकेला दिला नाही. पालिकेने स्वतःच्या निधीतून खर्च केला. अशापद्धतीची पुण्याला सावत्र वागणूक देखील द्यायला या सरकारने मागेपुढे पाहिले नाही. या सर्व पृष्ठभूमीवर मुख्यमंत्री घरातून निघाले ते थेट पुण्यासाठी... म्हणूनच त्यांचे विशेष कौतुक आहे... गेले सहा महिने पाठ फिरवून, फुटी कवडीही फेकून न मारता, कोमट पाणी पिण्याचा आणि लुडो, कॅरम खेळण्याचा फुकटचा सल्ला देण्यापलीकडे काहीही एक न करता... पुन्हा त्यांनाच तोंड दाखवायला निर्लज्जपणा लागतो िंकवा मग िंहमत लागते.
जनतेवर, राज्यावर संकट असताना सर्वप्रथम राजा समोर जातो, कारण त्यामुळे जनतेच्या मनातील भीती बर्‍याच प्रमाणात कमी होऊन त्यांना संकटाचा सामना करण्याचे बळ मिळत असते. राजा विक्रमादित्य याचे सर्वांत मोठे उदाहरण होते. ते वेश बदलून राज्यात फिरायचे आणि जनता खरंच सुखी आहे का, त्यांना काही दु:ख तर नाही ना, त्यांच्यावर कुठले संकट तर नाही ना, याची स्वत: खातरजमा करून घेत असे. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. छत्रपती शिवाजी महाराज देखील जनतेचे दु:ख समजून घेण्यासाठी स्वत: फेरफटका मारायचे आणि त्यांच्या नावावर आपला राजकीय पक्ष स्थापन करून, वेगळ्या पद्धतीची राजकीय पोळी शेकणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र, राज्यावर संकट येताच, स्वत:ला आपल्या ‘मातोश्री’ निवासस्थानी कोंडून घेतले. तिथूनच ते फेसबुक लाईव्हसारख्या माध्यमातून जनतेला लढा कसा द्यायचा, हे शिकवायचे. जनता बाहेर संकटाचा सामना करीत आहे, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, याची जाणीव असतानाही, त्यांनी तब्बल पाच महिने ‘मातोश्री’वरच मुक्काम ठोकला. अगदी कोरोना त्यांच्या दारापर्यंत आला, तरी ते बाहेर आले नाही. कदाचित ‘राजा सुरक्षित तर प्रजा सुरक्षित’ असा नवा सिद्धांत त्यांनी मांडला असावा. ‘प्रजा सुरक्षित तर राज्य सुरक्षित आणि राज्य सुरक्षित तरच राजा सुरक्षित’ या प्रचलित सिद्धांताच त्यांना विसर पडला. देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध नेत्यांनी त्यांच्या या घरघुसेपणावर आसूड ओढले. शेवटी 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या राज्यातील सर्वांत ज्येष्ठ नेते अर्थातच शरद पवार यांनी कान टोचले आणि दुसर्‍याच दिवशी राजा ‘मातोश्री’च्या बाहेर पडला. थेट पुणे गाठले. त्यांच्या या साहसाचे कौतुक करावे आणि शरद पवारांना शाबासकी द्यायची, हा चर्चेचा मुद्दा आहे. मराठीत एक म्हण आहे, ‘राजा बोले दाढी हाले.’ ही म्हण बरीच बोलकी आहे आणि या प्रकरणात तर ती तंतोतंत लागू होते.
 
 
जनतेवर संकट असताना, आपण दौरे करून त्यांना धीर द्यायला हवा, असा विचार आजवर एकदाही न आलेल्या ठाकरेंचे शरद पवारांच्या एका शब्दातून मतपरिवर्तन कसे झाले. प्रत्यक्षात राज्यात चर्चा अशीच आहे की, सरकार दुसरंच कोणी चालवतं. आता पवार बोलले आणि ठाकरे घराबाहेर पडले. यामुळे थोडी शंकेची पाल चुकचुकतेच. असू देत आता किमान साखरेचा प्रश्न आदेश भावोजींपर्यंत नेणारे आमचे गमतीदार मुख्यमंत्री आता कोरोनाविषयी तरी गंभीर असतील, अशी अपेक्षा करण्यापलीकडे आपल्या हाती काहीही नाही. अन्यथा तेच सारखप्रश्नाप्रमाणे पुन्हा एकदा तोंडावर अॅपटतील... सॉरी आपटतील एवढे मात्र, निश्चित...!
 
9270333886