हौसेपोटी बनविला चक्क साडेसहा तोळ्यांचा सुवर्णमास्क!

    दिनांक :01-Aug-2020
|
चिखली,
सध्या सर्वत्र कोरोना महामारीने संचारबंदी व आर्थिक मंदी असतांना एका व्यक्तीने चक्क साडेसहा तोळ्यांचा सोन्याचा मास्क तयार करून घेतल्याने ‘हौसेला मोल नसते’चे प्रत्यंतर आले असून कोरोनाच्या महामारीच्या काळातही बनवलेल्या या सोन्याच्या मास्कमुळे शहरात चांगलीच खुमासदार चर्चा रंगत आहेत.
 
 
suvarnamask_1   
 
आज घडीला सोन्याच्या भावाने 54 हजार 700 रूपये प्रतितोळा प्रमाणे उच्चांकी भाव गाठला आहे. मात्र, अशा स्थितीतही येथील आपल्या देशात बहुसंख्य पुरूष लोकांना देखील सोन्याचे दागिने घालण्याची हौस असते. या हौसेतून अनेकजण ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखले जात असल्याने आवड, प्रसिद्धी आणि लौकिकासाठी अनेक जणांकडून सोन्याचे दागीने वापरण्यात येत आहेत. दरम्यान कोरोनामुळे सध्या सर्वत्र ‘मास्क’ वापरणे बंधनकारक असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील दिपक वाघ या हौशी व सोन्याची आवड असलेल्या व्यक्तीने देखील सोन्याचा मास्क तयार करून घेतला आहे.
 
 
सर्व जग कोरोनाच्या प्रादुर्भावाने त्रस्त असताना आणि लॉकडाऊनमुळे अर्थचक्र मंदावलेले असताना तसेच सोन्याचे भाव गगणाला भिडलेले असताना चिखलीतील या ‘गोल्ड मॅन’ने कोरोनापासून बचाव करण्यासाठी चक्क साडेसहा तोळ्याचा हा सोन्याचा मास्क तयार करून घेतलेला आहे. या मास्कची अंदाजे किंमत 3 लाख 70 हजार एवढी आहे. दिपक वाघ यांना सोनं वापरण्याची आवड आहे. त्यांच्या गळा, हात नेहमीच सोन्याच्या आभुषणांनी मढलेलंच असते. काही दिवसांपूर्वी सोन्याचा मास्कविषयी आलेल्या बातम्या पाहून आपणही सोन्याचा मास्क तयार करून घ्यावा, ही कल्पना आवडली आणि त्यांनी तसा मास्क तयार करून घेतला आहे. चिखली येथील व्यक्तीने तयार करून घेतलेला सोन्याचा मास्क सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.