अमेरिकेचा चीनला आणखी एक झटका; घातली 'या' ॲपवर बंदी

    दिनांक :01-Aug-2020
|
वॉशिंग्टन, 
गेल्या काही दिवसांपासून कोरोना महामारीवरून अमेरिका आणि चीनमधील वाद वाढतच चालला आहे. अमेरिका चीनविरोधात एक एक पाऊल उचलत आहे. अशातच भारताने टिकटॉकसह अन्य चिनी ॲप्सवर बंदी घातल्यानंतर अमेरिकेतही या मागणीने जोर धरला होता. त्यानंतर आता अमेरिकेनेही भारताच्या पाऊलावर पाऊल टाकत टिकटॉकवर बंदी घातली आहे. एका एक्झिक्युटिव्ह आदेशासह अमेरिकेत २४ तासानंतर टिकटॉकवर बंदी घातली जाईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले. अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीनला चांगलाच झटका बसला आहे. 
trump_1  H x W: 
 
यापूर्वीच ट्रम्प यांनी अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घालत असल्याचे सांगितले आहे. सुरक्षेचा धोका लक्षात घेता आम्ही हा निर्णय घातला आहे, असे ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले. एका वृत्तसंस्थेशी बोलताना ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली. 
 
 
दरम्यान, मायक्रोसॉफ्ट कंपनी अमेरिकेतील टिकटॉकचा व्यवसाय खरेदी करणार असल्याचे म्हटले जात आहे. सोमवारपर्यंत ही डील पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, अशातच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही टिकटॉकवर बंदी घालत असल्याचे म्हटले आहे. 
 
 
लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर झालेल्या हिंसाचारानंतर भारताने चीनविरुद्ध कारवाई करत चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रयत्न केला. भारताने सुरक्षितेच्या कारणास्तव टिकटॉकसह १०६ चिनी ॲप्सवर बंदी घातली. भारताच्या कारवाईनंतर अमेरिकेतही टिकटॉकवर कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्यानंतर आता अमेरिकेनेही टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.