बेचिराख बैरुत!

    दिनांक :11-Aug-2020
|
आंतरराष्ट्रीय 
- वसंत गणेश काणे
दिनांक 4 ऑगस्ट 2020 च्या संध्याकाळी लेबनॉनची राजधानी व बंदरही असलेल्या बैरुत येथे एक जबरदस्त स्फोट (अणुबॉम्बसदृश) होऊन शंभरावर लोक मृत्युमुखी पडले आणि हजारो जखमी झाल्याचे वृत्त आहे. जप्त केलेल्या स्फोटक अमोनियम नायट्रेट नावाच्या पदार्थाचा प्रचंड मोठा साठा एका कोठारात अनेक दिवसांपासून जणू बेवारस पडून होता. हा पदार्थ खत म्हणून तसेच दारूगोळा तयार करण्यासाठीही वापरला जातो. अशी कोठारे लोकवस्तीपासून दूर असावीत, असा नियम असला, तरी त्याचे पालन या भ्रष्टाचारग्रस्त देशात क्वचितच होत असते. आता या स्फोटाच्या कारणांची चौकशी सुरू झाली आहे. बचाव कार्य म्हणून जखमींवर उपचार, वाचलेल्यांचा शोध सुरू आहे. लेबनॉनवर एकेकाळी फ्रान्सचा अंमल होता म्हणून फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी लेबनॉनला ताबडतोब भेट दिली व बेचिराख झालेल्या भागाचा दौरा केला. त्या वेळी लोकांनी त्यांना घेरले आणि मदत सरकारमार्फत न देता प्रत्यक्ष आमच्या हातात पडेल असे पाहा, असे म्हणत आर्जवे केली. लेबनॉनच्या जनतेला आपल्या सरकारच्या भ्रष्ट कारभाराबाबत किती खात्री आहे, हे यावरून स्पष्ट व्हावे.
 

Beirut Blast_1   
 
अध्यक्षांच्या निवासस्थानासकट बैरुतमधील सर्व महत्त्वाच्या वास्तू जमीनदोस्त झाल्या आहेत. रस्त्यावरची वाहने, फुंक मारलेल्या कागदाच्या कपट्याप्रमाणे उडाली होती. काचेची तावदाने चकनाचूर होऊन अनेक जायबंदी झाले, खरेखुरे बंगले पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणे कोसळले, स्फोटाच्या केंद्रापासून 10 किलोमीटर अंतरावरच्या घरांचीही मोडतोड झाली. मग केंद्रस्थानी काय झाले असेल याची कल्पनाच करावी, नव्हे, कल्पनाही करू नये, हेच बरे!
 
 
जीवित हानी
जखमी झालेल्या पाच हजारांची संख्या वेगाने कमी होत असून, मृत्यू पावणार्‍यांची संख्या तेवढ्याच वेगाने वाढत आहे. बैरुत शहरातील निम्म्या लोकांची घरे आता राहण्यासारखी राहिलेली नाहीत. प्रलय, प्रलय म्हणतात, तो यापेक्षा वेगळा असेल का? स्फोटानंतर आता बैरुतमधील अनेक बड्या हस्ती हयात नाहीत. अग्निशामक दलाचे अनेक फायर फायटर्स एकतर स्वत:च बळीतरी गेले आहेत िंकवा बेपत्तातरी झाले आहेत.
 
 

नक्की काय झाले?
काय झाले, याबद्दलची मतेे परस्परविरोधी आहेत. कोठाराजवळच कुणीतरी फटाके फोडल्याचे वृत्त समोर आले आहे. 2,750 मेट्रिक टन अमोनियम नायट्रेट गेली सहा वर्षे या कोठारात बेवारस व सुरक्षाव्यवस्थेशिवाय पडून होते, पण हा स्फोटक पदार्थ इथे आलाच कसा? तर त्याचे असे झाले की, 2013 मध्ये एक रशियन जहाज मोझँबिकला चालले होते. मध्येच जहाजावर बंड होऊन खलाशी जहाज सोडून गेले. कस्टम खात्याने जहाजावरचा अमोनियम नायट्रेटचा साठा उतरवून बंदराजवळच्या कोठारात ठेवला आणि जहाज जप्त केले.
 
 

कोण वाचले, कोण गेले?
वाचलेल्यांची शुश्रूषा करणार्‍या एका परिचारिकेने तीन छकुल्यांचे जीव वाचवले आहेत; तर इतर अनेक आपल्या गायब झालेल्या सग्यासोयर्‍यांच्या शोधात भटकत आहेत. वित्त आणि जीवितहानीची नक्की माहिती आम्हाला नाही आणि नजीकच्या भविष्यकाळात ती आम्ही देऊही शकणार नाही, अशा आशयाचे निवेदन, हमद हसन या मंत्रिमहोदयांनी जाहीर केले आहे. लोकच शोधाशोध करीत एकमेकांना मदत करीत आहेत. दवाखान्यांसमोर जखमींच्या लांबच लांब रांगा दिसताहेत.
 
 
स्फोट होताच लोक भयभीत होऊन सैरावैरा धावू लागले. रस्त्यांवर जखमींच्या रांगा, काचांचे टोकदार तुकडे, चेचल्या आणि चेपल्या गेलेली वाहने दिसत होती. आगी लागल्या ठिकाणापर्यंत अग्निशामक दलाची वाहने पोचू शकत नव्हती. त्यामुळे हेलिकॉप्टरमधून पाण्याचे फवारे सोडण्यात येत होते. मूर्तिमंत विनाश वेगळा का असेल? आसमंतात लाल धुराचे साम्राज्य पसरले. तो धूर लांबलांब अंतरावरूनही दिसत होता. एक महिला आपल्या लहानग्याच्या शोधात वणवण भटकत होती. ज्याला त्याला विचारत होती, कुणी पाहिलंत का हो माझ्या लेकराला? खूपच गोंडस आहे हो माझं लेकरू! बचाव पथकानं अनेक लेकरांना वाचवलं होतं! पण, त्यातलं हिचं गोंडस लेकरू कोणतं होतं? िंकवा त्यात ते होतं तरी काय, हे ते सांगू शकत नव्हते.
गतकाळात लेबनॉनमधून हद्दपार झालेल्यांचे प्रतिनिधित्व करणारा पुतळा मात्र तसाच ताठ उभा होता. त्याच्या आजूबाजूच्या इमारती मात्र जमीनदोस्त झाल्या होत्या. पण, त्याच्या चेहर्‍यावर अंकित असलेले मूळ भाव आज वेगळेच दिसत होते का? बाजूलाच एक वयस्क महिला ढिगार्‍यातून वाचलेले किडुकमिडुक एका बोचक्यात भरून पाठीवर घेऊन उभी होती. सॅटेलाईटने एका छायाचित्रात बैरुत शहरात एक भलेमोठे विवर तयार झालेले दाखविले आहे.
 
 
बैरुत शहर डिझॅस्टर सिटी
बैरुत शहर डिझॅस्टर सिटी म्हणून घोषित करण्यात आले आहे. दाहेर नावाच्या विमाननिर्मिती करणार्‍या उद्योगसमूहाच्या प्रमुखाने या प्रश्नाचा पिच्छा पुरवण्याची घोषणा केली आहे. काय घडले, कसे घडले, जबाबदार कोण, हे तुम्ही शोधणार नसाल तर आम्ही शोधून काढू आणि त्यांना शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी घोषित केले आहे. अमोनियम नायट्रेटचा एवढा मोठा साठा नागरी वस्तीला लागून असलेल्या कोठारात वारंवार कळवूनही 2014 पासून पडून राहिलाच कसा?
 
 
वेगवेगळी मते
आता तज्ज्ञांची वेगवेगळी मते यायलाही सुरवात झाली आहे. स्फोट केवळ अमोनियम नायट्रेटमुळे झाला नसावा, असे त्यांना वाटते. काही अमेरिकन तज्ज्ञ म्हणतात की, धुराच्या रंगावरून हे केवळ अमोनियम नायट्रेटमुळे घडले असेल, असे वाटत नाही. इतर संयुक्तेही सोबत असली पाहिजेत. धुराच्या लाल/सोनेरी रंगावरून अशीही शंका येते आहे की, अमोनियम नायट्रेटसोबत काही लष्करी स्फोटकेही असावीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी एकदा नव्हे तर दोनदा घोषित केले आहे की, हा घातपाती हल्लाच आहे. पण, अमेरिकेच्या संरक्षण खात्याला मात्र असे वाटत नाही, हे महत्त्वाचे आहे. बैरुत शहर आज रडते, ओरडते आहे. अनेकांना फेफर्‍याचा झटका आला आहे. काही नखशिखान्त थरथरत आहेत, तर अनेक हवालदिल झाले आहेत.
 
 
2005 मध्ये कोठाराच्या जवळपासच कारबॅाम्बचा वापर करून लेबनॉनचे तेव्हाचे अध्यक्ष रफिक हारीरी यांना उडविण्यात आले होते. त्या खटल्यातील चार आरोपींच्या खटल्याचा निकाल तीन दिवसांवर आला असतानाच हा स्फोट झाला आहे. याला योगायोग म्हणायचं की आणखी काही?
9422804430