श्रीकृष्ण जन्माष्टमीवरही कोरोनाच सावट

    दिनांक :11-Aug-2020
|
- मुर्तीकारांचे आर्थिक गणित कोलमडले
विलास नवघरे
गिरड,
गेल्या पाच महिन्यांपासून उद्भवलेल्या कोरोनामुळे सर्वच धार्मिक सण उत्सवाला ब्रेक लागले आहे. शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार्‍या श्रीकृष्ण जन्माष्टमीवरही कोरोनाच सावट दिसून येते आहे. मोठ्या प्रमाणात साजरा होणारा कृष्णजन्म यावर्षी अगदी साध्या पद्धतीने करावा लागणार असल्याने छोटा कन्हैया घेण्यावर भक्तांचा भर असल्याने कुंभारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. बाजारपेठेतही पाहिजे तसा उत्साह दिसून येत नसून दहीहांडीचाही काही बोलबाला नाही.
 

krishna_1  H x
दरवर्षी जे लोक घरी श्रीकृष्णच्या मुर्तीची स्थापना करून जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करीत होते. ते यावर्षी घरघुती पद्धतीनेच जन्माष्टमी करणार आहेत. त्यामुळे गावा खेड्यात श्रीकृष्णाच्या मोठ्या मुर्तीचे आकर्षण होते ते मात्र कमी झाले असून कसातरी कुळाचार पार पाडण्यावर कृष्णभक्तांचा भर दिसून येत आहे. लहान मुर्तीकडे भक्तांचा कल असल्याने कुंभार परिवासांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अवघ्या काही तासांतच श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव आला आहे. मात्र दर वर्षी प्रमाणे यावेळी श्रीकृष्ण भक्तांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात उत्साह दिसत नाही. जन्माष्टमीसाठी मुर्तीकारांनी मोठ्या प्रमाणात मुर्ती तयार केल्या आहेत. मात्र, कोरोनामुळे पाहिजेत त्या प्रमाणात मुर्तीला भाव मिळत नाही. या उत्सवासाठी लागणार्‍या साहित्याची विक्री सुद्धा कमी होत असल्याने त्याही व्यापार्‍यांचे नुकसान होत आहे. आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे श्रीकृष्ण भक्तांना जन्माष्टमीचा उत्सव अगदी साधेपणाने घरात साजरा करुन श्रीकृष्ण देवाला कोरोनाच संकटं लवकर दूर करण्याचे साकडे घालावे लागणार आहे.