शहरातील क्रिकेटपटू कधी उतरणार मैदानावर?

    दिनांक :11-Aug-2020
|
- चार महिन्याहून अधिक काळ सरावात खंड
 
निखिल केळापुरे
नागपूर,
देशांतर्गत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेचे सलग दोनवेळा जेतेपद प्राप्त करीत विदर्भ संघाने ऐतिहासिक कामगिरी केली होती. यंदा १९ नोव्हेंबरपासून देशांतर्गत क्रिकेट हंगामाला प्रारंभ करण्याची योजना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची- बीसीसीआयची आहे. परंतु, विदर्भात पर्यायाने महाराष्ट्रात क्रिकेटपटूंना साधी सरावासाठीही परवानगी अजूनपर्यंत मिळाली नाही. त्यामुळे देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धेत विदर्भ संघ कशी कामगिरी करणार आणि नागपुरातील क्रिकेटपटू मैदानावर सरावासाठी कधी उतरणार असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
 

cricket _1  H x 
 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात टाळेबंदीचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. तब्बल तीन महिन्याहून अधिक काळाची टाळेबंदी लावण्यात आली होती. तसेच कोरोना विषाणूच्या साथीमुळे बीसीसीआयच्या स्थानिक क्रिकेट हंगामावर देखील याचा परिणाम झाला यात शंकाच नाही. मात्र आता मोकळीकची प्रक्रिया संपूर्ण देशात सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारपेठांसह हळूहळू मैदाने देखील सरावासाठी खेळाडूंना इतर राज्यात उपलब्ध झाली आहे. मात्र महाराष्ट्रात क्रिकेटपटूंना सरावासाठी अजूनही मैदाने खुली झाली नाही.
 
 
१९ नोव्हेंबरपासून देशांतर्गत क्रिकेट सुरू करण्यास बीसीसीआयने संमती दर्शविली आहे. एवढेच नाही तर सध्या कोरोनानिमित्त आखून दिलेल्या नियमांचे पालन करीत इंग्लंडमध्ये क्रिकेट सुरू देखील झाले आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे आयपीएलच्या १३ व्या हंगामाची सुरुवात देखील होत आहे. मग असे असून देखील राज्यातील क्रिकेटपटूंना साध्या सरावाची परवानगी देखील मिळालेली नाही. इतर राज्यात कोरोना नियमावलीचे पालन करीत क्रिकेट सरावाला प्रारंभ झाला आहे. मग महाराष्ट्रात क्रिकेटपटूंना सरावाला कधी परवागनी मिळणार असा प्रश्न शहरातील क्रिकेटपटूंसह प्रशिक्षकांना पडला आहे. त्यामुळे देशांतर्गत तीन महिन्यानंतर सुरू होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत विदर्भ संघ कशी कामगिरी करणार यावर प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे.
 
 
यासंदर्भात विदर्भ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, सध्या आभासी पद्धतीने प्रत्येक वयोगटाच्या क्रिकेटपटूंचे प्रशिक्षण सुरूच आहे. परंतु, प्रत्यक्ष मैदानावार सरावासाठी परवानगी नसल्याने क्रिकेटपटू मैदानावर जाऊ शकत नाही. आम्ही देखील राज्य आणि नागपूर प्रशासनाच्या परवानगीची वाट पाहत आहोत. ती परवानगी मिळाल्यास खेळाडूंची सर्व शिबिरे परत सुरू होतील.
 
 
बीसीसीआयने नियमावली ठरवून दिली असून याबाबत सकारात्मकता देखील दर्शविली आहे. त्या नियमानुसारच स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळाल्यावर मैदानावरील सरावास सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही पूर्णपणे सज्ज
ऐन उन्हाळ्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण मैदाने एकाच वेळी बंद झाली होती. यामुळे क्रिकेटपटूंना सराव करता आला नाही. परंतु, आता जर १ सप्टेंबरपासून सरावासाठी परवानगी मिळाली तर आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. एनसीएमध्ये चार खेळपट्ट्या सरावासाठी असून अ‍ॅस्ट्रोटर्फ देखील क्रिकेटपटूंसाठी उपलब्ध आहे. किमान व्हीसीए अंतर्गत खेळणाऱ्या खेळाडूंना तरी सरावास परवानगी मिळाली तर स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड करण्यास सोयीचे जाईल असे मत एनसीएचे संचालक माधव बाकरे यांनी व्यक्त केले.
 
नियमांचे पालन करू
मागील चार महिन्यापासून क्रिकेट अकादमी कोरोनामुळे बंदच आहे. परंतु आता मोकळीकची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र सोडून इतर राज्यात क्रिकेटसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जी नियमावली ठरवून दिली त्याचे पालन करून खेळाडूंना सराव करता येणार आहे. क्रिकेट सुरू करताना सर्व क्लबला नियमावली ठरवून दिली तर त्याचे सर्व प्रशिक्षक पालनच करतील, असे मत श्री स्पोर्ट्स अकादमीचे संचालक समीर खरे यांनी व्यक्त केले.