जपानने दिला लष्करी कारवाईचा इशारा

    दिनांक :12-Aug-2020
|
-चीनची सातत्याने पूर्व समुद्रात घुसखोरी
टोकियो,
पूर्व समुद्रातील आपल्या हद्दीत प्रवेश केल्यास थेट लष्करी कारवाई करू, असा इशारा जपानने चीनला दिला आहे. या परिसरात होणार्‍या मासेमारी नौकांच्या घुसखोरीला चीनची फूस असल्याचा संशयही जपानने यावेळी व्यक्त केला आहे.
 
 
Japan military_1 &nb
 
दिआओयू बेट समूहावर जपानचे नियंत्रण असून, त्यावर चीनने दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांत या द्वीपसमूहावरून वाद सुरू आहे. चिनी मासेमारी नौका जपानच्या हद्दीत अनेकदा घुसखोरी करतात, तर दिआओयू द्वीपसमूह आमच्याच देशाचा भाग असून, चिनी मासेमारांना बंदी घालू शकत नसल्याचे सांगत, चीनने आपली हेकेखोरी कायम ठेवली आहे. याबाबत जपानचे संरक्षण मंत्री तारो कोनो यांनी सांगितले की, जपानी सैन्य चीनच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे. याआधी 2016 मध्ये चिनी तटरक्षक दलाच्या 28 नौकांनी या भागात घुसखोरी केली होती. दीड वर्षांपासून चिनी तटरक्षक दलाच्या नौका सातत्याने जपानवर दबाव निर्माण करीत आहेत. जपानने सातत्याने इशारा दिल्यानंतरही चिनी नौकांनी 111 दिवस घुसखोरी केली होती.
 
 
भारत, जपान आणि अमेरिकेसोबत तणावाचे संबंध असतानाच, चीनने दोन अणवस्त्रवाहू क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याचे वृत्त समोर आले आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने युद्धसरावादरम्यान डीएफ-16 आणि डीएफ-26 क्षेपणास्त्रांची चाचणी केली. यात डीएफ-26 क्षेपणास्त्रे अणुबॉम्बद्वारे हल्ला करण्यास सक्षम असून, त्याची मारक क्षमता सुमारे चार हजार किमी असल्याचे सांगितले जाते. या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात पूर्ण भारतासह प्रशांत महासागरातील अमेरिकेचा गुआम नाविक तळही येतो. हे क्षेपणास्त्र 2016 मध्ये लष्कराच्या ताफ्यात सहभागी केले होते तसेच 1200 ते 1800 किलो वजनाचे अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता राखून आहे.