बालभारतीतील भ्रष्टाचार उघड करणार्‍या अश्विनी जोशी यांची बदली

    दिनांक :12-Aug-2020
|
मुंबई,
पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (एससीईआरटी) या दोन्ही संस्थांचा भ्रष्ट कारभार उघड करणार्‍या प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक अश्विनी जोशी यांचीच राज्य सरकारने तडकाफडकी बदली केली आहे.
 
 
Ashwini Joshi_1 &nbs
 
या दोन्ही संस्थाकडून सरकारच्या निधीचा होत असलेला दुरुपयोग, तसेच तिथे होत असलेल्या आर्थिक अनियमिततेची राज्याच्या वित्त विभागामार्फत चौकशी करण्याबाबतचा प्रस्ताव जोशी यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्य सचिवांना पाठविला होता. त्याची दखल घेण्याऐवजी जोशी यांनाच बदलीची शिक्षा देण्यात आली आहे.
 
 
अश्विनी जोशी यांना तत्काळ पदावरून मुक्त करीत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे कार्यभार सोपविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांची नव्याने कुठेही नियुक्ती करण्यात आलेली नाही. जोशी यांच्या बदलीमागे शिक्षण विभागातील राजकारण आणि अधिकार्‍यांमधील वाद कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.