वर्धा जिल्ह्यात सेरो सर्व्हेक्षणाला सुरुवात

    दिनांक :12-Aug-2020
|
तभा वृत्तसेवा
वर्धा,
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सूचनेनुसार, जिल्ह्यात सेरो चाचणीस सुरुवात करण्यात आली आहे. सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या मदतीने ही चाचणी जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. ही चाचणी म्हणजे, कोरोना चाचणी नसून यामध्ये यापूर्वी कोरोना झाला की नाही, हे माहिती करण्यासाठी रक्तातील अ‍ॅन्टिबॉडिज तपासल्या जाणार आहे.
 
 
sero_1  H x W:
 
2 हजार 400 व्यक्तीचे रक्ताचे नमुने जिल्ह्यातील सर्वच भागातून घेतले जाणार आहे. हा अभ्यास करताना जिल्ह्यातील काही भागातील लोकांची निवड केली जाते. सर्वसाधारण नागरिक, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिक तसेच अती जोखमीचे, अशा तीन गटात लोकांची निवड केली जाते. यामध्ये आरोग्य सेवेतील कर्मचारी, पोलिस, भाजीविक्रेते, औद्योगिक कामगार यांच्यासह पत्रकारांचे सुद्धा नमुने घेतले जाणार आहेत. महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या सहकार्‍याने रक्ताचे नमुने गोळा केले जाते. एखाद्या व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास हे तपासण्यासाठी अ‍ॅन्टिबॉडिज टेस्ट केली जाते. या तपासणीच्या माध्यमातून व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी रक्तपेशी तयार झाल्या किंवा नाही हे तपासले जाते. जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असेल आणि त्या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी रक्त पेशी तयार झाल्या असतील तर ते सेरो टेस्टमधून दिसून येते.
 
 
 
ज्या भागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले असतील त्या परिसरातील ठराविक लोकांचे नमुने गोळा करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील आर्वीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून शहरात मागील दोन दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालयाचे चमू आर्वीत निवडक भागात रक्ताचे नमुने गोळा करण्याचे काम करत आहे. यामध्ये साधारण 70 लोकांचे नमुने घेण्यात आले असल्याची महिती वैद्यकीय अधिक्षक डॉ मोहन सुटे यांनी दिली. यासह जिल्ह्यातील इतर भागातीलही रक्ताचे नमुने घेतले जात आहे. ही माहितीा जमा केल्यानंतर महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे डॉक्टर आणि त्याचे पथक निष्कर्ष काढणार आहेत.