राखीसाठी गेली, अन् कोरोणा घेऊन आली

    दिनांक :12-Aug-2020
|
तभा वृत्तसेवा
सिंदी(रे.),
भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी गेलेल्या भगिनीला रात्री मुक्काम करणे चांगलेच अंगलट आले. त्या महिलेला सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील 36 वर्षीय महिला रक्षाबंधनासाठी समुद्रपूर तालुक्यातील वायगाव ( हळद्या) येथे भावाकडे गेली होती. सोबत तिचा पती सुद्धा होता. राखीचा सोहळा पार पडला. भावाने आग्रह केला म्हणून बहीण जावायाने मुक्काम ठोकला. पावसाचा कहर म्हणून दोन दिवस थांबले.
 

corona_1  H x W 
 
जन्माष्टमी साजरी करण्यासाठी घरी परतले. मंगळवार 11 रोजी रात्रभर त्या महिलेला ताप चढला. श्वास घेताना त्रास होऊ लागला. आज बुधवार 12 रोजी सकाळी सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी केली असता वैद्यकीय अधिकारी डॉ. डगवार यांनी सर्व लक्षणे बघून त्या महिलेला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात पाठविले. तिचा अहवाल कोरोना सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले आहे. महिलेच्या परिवारातील सदस्यांची तपासणी करण्यात आली असून पूर्ण सदस्यांना गृह विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
 
 
पुलगाव : येथे 12 रोजी येथील टिळकनगर व नागपूर फैल भागात कोरोनाचे संशयीत रुग्ण आढळून आले. सोमवारी नागपूर फैलात एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता. नगर पालिकेने काल येथील संपूर्ण भाग टाळेबंद केला होता. आज पुन्हा त्याच रुग्णाच्या संबंधात आलेले हे दोन रुग्ण आढळल्याने प्रशासनाची पुन्हा काळजी वाढली आहे.
 
जिल्ह्यात 17 कोरोनाबाधितांची नोंद
आर्वी तालुक्यात 6, दयालनगर, गजानननगर पिपरी मेघे, इंदिरानगर आर्वी नाका येथे प्रत्येकी 1, सेलू येथे 2, समुद्रपूर तालुक्यात वायगाव हळद्या येथे 3, आष्टी तालुक्यातील बेलोरा येथे 1, हिंगणघाट तालुक्यातील वणी छोटी येथे 2 तर हिंगणघाट येथील ज्ञानेश्वर वार्ड येथे 1 कोरोनाबाधित आढळून आला.