बँकेकडून शेतकर्‍यांना जीवन विम्याची सक्ती

    दिनांक :12-Aug-2020
|
-स्टेब बँक व्यवस्थापकाला भाजपाचा घेराव
-सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
तभा वृत्तसेवा
पथ्रोट, 
अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक शेतकर्‍यांना कर्ज देताना त्या कर्जातून त्यांना जबरीने जीवन विमा काढायला लावत असून कर्जाच्या रक्कमेतून विम्याची रक्कम कपात करत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बुधवारी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांना घेराव घालून हा प्रकार बंद करावा व सर्व ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी, अशी मागणी केली.
 
life cur_1  H x
शिंदी बुद्रुक येथील स्टेट बँक व्यवस्थापक, रोखपाल व अन्य कर्मचारी ग्राहकांना उद्धट वागणूक देत असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच ज्या शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले आहे व ज्यांना नवीन कर्ज देण्यात आले आहे, त्या शेतकर्‍यांना जबरीने जीवन विमा काढण्यास भाग पाडले जाते. शेतकर्‍याने कितीही नाही म्हटले तरी परस्परच त्यांना दिलेल्या कर्जाच्या रकमेतून विम्याची रक्कम कपात केली जाते. अनेक शेतकर्‍यांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर आज भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते थेट बँक व्यवस्थापकाच्या कक्षात शिरले. त्यांना घेराव करून जाब विचारला. फेरफारची अट रद्द करण्यात येईल.
 
तसेच जबरीने कोणत्याही शेतकर्‍याचा विमा काढला जाणार नाही असे आश्वासन व्यवस्थापकांनी दिले. सात दिवसात परिस्थिती न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. हे आंदोलन जिल्हा परिषदेचे भाजपाचे गटनेते व महामंत्री प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे, अरुण सरडे, युवा मोर्चा अध्यक्ष समीर हावरे, तालुका महामंत्री शैलेश आपले, तालुकाध्यक्ष विशाल काकड, सचिन कडू, प्रसन्न कठाळे, अनंता लिल्हरे, रितेश उमक उपस्थित होते.
 
शेतकर्‍याने सांगितली आपबिती
नरसिंगपूर कोल्हा येथील भास्कर व्यवहारे या शेतकर्‍याने त्यांना कर्जमाफी झाल्यानंतर नवीन कर्ज मिळाले. त्या कर्जातून पंधरा हजार रुपये कपात करण्यात आली. याविषयी विचारणा केली असता तुमचा जीवन विमा काढण्यात आला असल्याचे बँक व्यवस्थापका कडून त्यांना सांगण्यात आले. शेतकर्‍याने नकार दिला परंतु, त्याचे काहीही ऐकून घेण्यात आले नाही. दरवर्षी पंधरा हजार रुपये असा दहा वर्षे हा विमा त्या शेतकर्‍यांना भरावा लागणार असून जबरीने त्यांच्यावर हा भुर्दंड लादला जात असल्याचे व्यवहारे यांचे म्हणणे आहे. असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना जबरीने विमा काढण्यास भाग पाडले जात आहे.