महेंद्री जंगलाला मिळणार अभयारण्याचा दर्जा

    दिनांक :12-Aug-2020
|
- प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
तभा वृत्तसेवा
वरुड,
तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या महेंद्री जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या नागपूर येथे बैठकीत या अभयारण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश वनविभागाला दिले. यामुळे वरुड तालुक्याच्या वनवैभवात भर पडली असून जंगल टुरिझमला चालना मिळणार आहे.

jangal_1  H x W 
सातपुड्याच्या कुशीत वरुड वनपरिक्षेत्राचे 10 हजार 200 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. या जंगलालगत सातपुड्याच्या डोंगररांगा आहेत. वर्धा डायव्हर्शन, सुपर एक्सप्रेस कॅनाल तसेच शक्ती, जीवना, चुडामणी, सोकी नद्या याच पर्वतातून तालुक्यात प्रवाहित होतात. भेमडी, झटामझिरी, शेकदरी, नागठाणा-1 आणि 2, सातनूर, पुसली, वाई, पंढरी मध्यम प्रकल्प असून वाघ, बिबट, अस्वल, रोही, हरिण, रानडुकरांसारखे प्राणी या जंगलात आहेत. अनेक पक्षी, फुलपाखरांच्या प्रजाती आहेत.
 
वनौषधी परिसर, गव्हाणकुंड आणि धनोडी येथे वनउद्यान आहे. अनेक प्रकारची वृक्षे आहेत. 108 वर्षांचे ऐतिहासिक विश्रामगृह सुद्धा आहे. महेंद्री-पंढरी परिसर अभयारण्य घोषित करावे, अशी मागणी वन्यप्राणीप्रेमींकडून केली जात होती. अखेर मुख्यमंत्री ठाकरे यांनी वन्यजीव मंडळासोबत व्हिसीद्वारे बैठक घेऊन महेंद्री जंगलाला अभयारण्य करण्यास मंजुरात दिली. तसा प्रस्ताव वनविभागाने तातडीने सादर करावा असे आदेश दिले.
 
स्थानिकांसाठी उत्तम संधी
महेंद्री वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षापासूनची होती. ती मान्य करण्यात आली आहे. या अभायारण्यामुळे स्थानिक नागरिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि वन्यजीव अभ्यासकांनाही अभ्यासाची संधी मिळेल. समन्वय साधून येथे पुढील उपायोजना व्हाव्या.
- यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक