फुटणार नाही तान्हा पोळा!

    दिनांक :12-Aug-2020
|
- बैल पोळा होणार नाही सार्वजनिकरित्या साजरा
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
ग्रामीण भागात बैलपोळा व तान्हा पोळा उत्साहात साजरा केला जातो. पण यंदा कोरोनाच्या संकटाने शेतकर्‍यांच्या या महत्त्वाच्या उत्सवावरही सावट आणले आहे. हे सण सार्वजनिकरित्या साजरे करू नये, असे आदेशच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शासन निर्णयान्वये निर्गमित केले आहे.
 
 
pola_1  H x W:
 
वर्षभर शेतात शेतकर्‍यासोबत राबराब राबून मोती पिकविणार्‍या बैलाला पुरणपोळी घालण्याचा हा दिवस असतो. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे शेतकर्‍यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. यंदा घरच्या घरीच बैलाची पूजा तेवढी करता येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी बैल पोळा साजरा केल्यास कारवाई होणार आहे.
 
 
पोळ्यायानिमित्त बाजारपेठेत सजावटीच्या विविध वस्तू दिसत होत्या. परंतु, बाजारावर सध्या कोरोनाचे सावट असल्याने गावगावांत फिरुन विक्री करू लागले आहे. साहित्य बाजारात विकणे आणि घेण्याची मजा असते, ती दारावर आलेल्या साहित्याला नसल्याचे मत शेतकरी आणि व्यापारी दोघांनीही व्यक्त केले आहे. पोळ्यावर निर्भर असलेल्या बैलांच्या साजाचा व्यापारीदेखील उद्भभवलेल्या परिस्थितीमुळे चिंतातूर झाल्याचे चित्र आहे.
 
 
 
कोरोना संसर्गजन्य रोगाने चंद्रपूर जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागाला आपल्या विळख्यात घेतले आहे. दिवसागणिक वाढत्या रुग्णाने यंदा अनेक सणांवर गडांतर येत आहे. पोळा सणानिमित्त बेल्हे, घुंगरू, झालर, दोरी, नाथे, कवळी, रंग, हिंगुळ सर, बेगड, घोगरमाळ, मोरखी या वस्तू मोठ्या प्रमाणात गावोगावी फिरून शेतकर्‍यांच्या दारात पोहोचून विक्री केली जात आहे. कोरोना महामारीने यंदा सण, उत्सवावर यंदा बंदी आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या तान्हा पोळ्यावरही संकट आले आहे. तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर सुतार कारागिरांनी नंदी बैल तयार केले. पण, नंदी बैल कुणी घेतच नसल्याने त्यांचे चार महिन्याचे कष्ट वाया गेले आहे.