अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता

    दिनांक :12-Aug-2020
|
जल पातळीत झाली वाढ
धरणात अपेक्षित जलसाठा
तभा वृत्तसेवा
मोर्शी , 
अपेक्षित जलसाठा झाल्याने येत्या 48 तासात अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे केव्हाही उघडू शकतात. त्यामुळे नदी काठावरच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

appar wardha_1   
गेल्या आठवड्यापासून अमरावती जिल्ह्यात नावलौकिक असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणात येणार्‍या वर्धा, माडू ,पाक, जाम नदी भरभरून वाहत असल्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरणात 31 ऑगस्ट पर्यंत 93.59 टक्के साठा अपेक्षित आहे.
 
12 ऑगस्ट सकाळी सात वाजता अप्पर वर्धा धरणाची जलाशय पातळी 341.85 मि. एवढी झाली असून आज रोजी धरणात 506.38 दलघमी इतका जलसाठा झालेला आहे. त्याची टक्केवारी 89.78 आहे. धरणाच्या कार्यक्षेत्रात पाऊस झाल्यास धरणाचे दरवाजे 48 तासात पर्जन्यमानाचा अंदाज पाहता केव्हाही उघडू शकते अशा प्रकारच्या नोटिस उपविभागीय अभियंता उर्ध्व वर्धा धरण उपविभाग - 1 मोर्शी यांनी वर्धा नदीच्या काठावर असलेल्या आर्वी , चांदुर रेल्वे येथील तहसीलदारांना दिल्या असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .