मालमत्ता, पाणी कर 50 टक्के माफ करा

    दिनांक :12-Aug-2020
|
-महापौर संदीप जोशी यांचे निर्देश
-बिल संबंधी लोकप्रतिनिधींची बैठक
नागपूर,
कोव्हिडमुळे व्यापारी, व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिक सर्वांचेच हाल झाले आहेत. अनेकांची परिस्थिती वाईट आहे. अशा या काळात नागरिकांवरील मालमत्ता कर आणि पाणी बिलाचे दडपण न लादता सरसकट 50 टक्के कर आणि पाणी बिल माफ करावे, अशी सर्व जनप्रतिनिधींची भूमिका आहे. यासंबंधीचा प्रस्ताव सभागृहात सादर करण्यात यावा.

meyor_1  H x W: 
तसेच महानगरपालिकेच्या कायद्यानुसार शास्ती माफ करण्याचा अधिकार आयुक्तांकडे असून त्यांनी यासंबंधी संवेदनशीलता दाखवून मालमत्ता कर व पाणी बिलावरील शास्ती माफ करावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.
 
मालमत्ता कर आणि पाणी बिल माफ करण्यासंबंधी बुधवारी महापौरांच्या अध्यक्षतेत शहरातील सर्व जनप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत महापौर संदीप जोशी यांच्यासह आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, नागो गाणार, मोहन मते, प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, कर समिती सभापती महेंद्र धनविजय, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर आदी उपस्थित होते.
 
बैठकीत उपस्थित जनप्रतिनीधींनी मालमत्ता कर व पाणी बिलासंबंधी आपापली भूमिका मांडली. यावेळी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, सध्याच्या काळात नागरिक संकटात आहे. नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. अनेकांवर मनपाची मालमत्ता कर थकबाकी आहे. यावर उपाय म्हणून मोहिम राबवून 50 टक्के कर माफ केल्यास जनतेलाही दिलासा मिळेल व मनपालाही महसूल मिळेल, अशी सूचना त्यांनी मांडली.
 
पाणी आणि मालमत्ता कराच्या बिलासंबंधी बोलताना आमदार प्रवीण दटके म्हणाले, एकीकडे लोकांना दर महिन्याला कोणतेही बिल दिले जात नाही आणि दुसरीकडे त्यांच्याकडून ते बिल भरले जाईल अशी अपेक्षा करणे योग्य नाही. वेळेवर प्रत्येक नागरिकाला दर महिन्याचे बिल जाणे हे अपेक्षित आहे. पाण्याच्या संदर्भात ओसीडब्ल्यूच्या कंत्राटात तसे नमूद आहे. मात्र कंपनीकडून आजपर्यंत महिन्याचे बिल देण्यात आले नाही. नागरिकांकडून वेळेवर बिल भरणाची अपेक्षा केली जात असेल तर त्यांना दर महिन्याला वेळेवर बिल दिले जावे. ते न दिल्यास जनतेसह आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
 
आ. मोहन मते यांनी प्रत्येक महिन्याला नागरिकांना पाण्याचे बिल दिले जात नसल्याने थकबाकीची समस्या वाढत असल्याच्या मताला दुजोरा दिला. योग्य वेळेत बिल न मिळाल्यामुळेच शास्ती माफ करण्यातही अडसर निर्माण होत असल्याचे मत आमदार गिरीश व्यास यांनी मांडले. सत्तापक्षनेते संदीप जाधव यांनी मागील वर्षीची शास्ती सरसकट माफ करण्याची मागणी केली. महानगरपालिकेमध्ये यापूर्वी अनेकदा मालमत्ता कर आणि पाणी बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आताही नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे, असे तानाजी वनवे यांनी सांगितले.
बैठकीला दांडी मारणे योग्य नाही-महापौर
जनतेच्या प्रश्नासंबंधी 31 जुलै रोजी मनपाच्या आयुक्त सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. याबैठकीला मनपा आयुक्त उपस्थित नव्हते पाणी आणि मालमत्ता कर संदर्भात नागरिकांना सहन करावा लागणारा मन:स्ताप लक्षात घेता यावर तोडगा काढण्यासाठी आज 12 ऑगस्ट रोजी महत्वाची बैठक घेण्यात आली. आयुक्त या बैठकीलाही अनुपस्थित राहिले. वारंवार बैठकीला दांडी मारणे योग्य नाही, असा टोला महापौर जोशी यांनी आयुक्तांना लावला.