शपथ घेतली भावांनी तृतीयपथीयांच्या रक्षणाची...

    दिनांक :12-Aug-2020
|
- समाजभानातून मिळाले आयुष्यभरासाठी भाऊ
- नागपुरात साजरा झाले आगळेवेगळे रक्षाबंधन
शैलेश भोयर
नागपूर,
तृतीयपंथी असले तरी ते आपल्यासारखेच हाडामासाचे आहेत. त्यांचेही रक्त लाल आहे. त्यांनाही मन, भावना आणि इच्छा आहेत. मात्र, त्यांच्या बहुतांश इच्छा जागच्या जागीच राहतात नव्हे दबल्या जातात. त्यांनाही स्त्री-पुरुषांसारखे जगण्याची इच्छा आहे. ते परग्रहवासी नाहीत. माणसाप्रमाणेच आहेत. परंतु त्यांना स्वीकारण्याबाबत समाजमनात आजही संभ्रमावस्था आहे. अशा स्थितीत एका भावाने त्यांच्याकडून मनगटावर रेशिमधागा बांधून घेत त्यांच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली. रक्षाबंधनाचा हा आगळावेगळा कार्यक्रम किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे मुंजे सभागृह येथे नुकताच पार पडला.

rakhi third_1
राखी बांधली हातावर रीत जगाची... शपथ घेतली भावाने तिच्या रक्षणाची... तृतीयपंथीयांकडून राखी बांधून घेत त्यांच्याविषयी समाजात बंधुभावाचा संदेश दिला गेला. हे केवळ बंधन नाही, प्रेमाचे प्रतीक आहे. बहीण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. भावाचा उत्कर्ष व्हावा आणि भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना. रक्षणकर्ता भाऊ माझे बंधन पाळणार... मायेचा हात बहीण भावाच्या पाठीवरून फिरवणार... असाच काहीसा संदेश देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला.
सामाजिक कार्यक्रम नेहमीच होताना आपण पाहिले आहे. अशा कार्यक्रमात महिलांचा मोठ्या प्रमाणात पुढाकार असतो. त्यामुळे आपणही रक्षा बंधनाचा कार्यक्रम घ्यावा. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात चांगला संदेश पोहोचविण्याची कल्पना डोक्यात आली. लगेच संस्थेच्या माध्यमातून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय झाला. परिसरातील बहीण-भावांना एकत्रित करून हा कार्यक्रम यशस्वी केल्याचे संस्थेच्या अध्यक्ष राणी ढवळे सांगतात. कुठल्याही प्रकारची शंका मनात न बाळगता एका शब्दावर बहीण-भाऊ कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. श्रद्धा जोशी, डॉ. जयश्री बारई आणि किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांनी एक आगळेवेगळे रक्षाबंधन पार पडले. भारतीय संस्कृतीत एक बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी, गंध-अक्षता लावण्यासाठी ओवाळण्याचा जो विधी करते अगदी त्याचप्रमाणे तृतीयपंथी बहिणी नटून आल्या होत्या. भावांची गर्दी पाहून त्या अगदीच भावूक झाल्या अन् त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या आनंदाच्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.
पोलिस ठाण्यात तर नेहमीच अशा प्रकारचा उपक्रम केला जातो. मात्र, तृतीयपंथीयांकडून भावाला राखी बांधण्याचा सार्वजनिक कार्यक्रम पहिल्यांदाच साजरा करण्यात आला. किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष आणि किन्नर विकास महामंडळाच्या सदस्या राणी ढवळे, राशी कोचे, पूजा वर्मा, माही वर्मा, रोशनी वर्मा, सानिया ढवळे, पूर्वी वर्मा आदी तृतीयपंथींनी भावांना राखी बांधली. समाजाने त्यांना समानतेची वागणूक द्यावी, अशी किमान अपेक्षा तृतीयपंथीयांनी व्यक्त केली.
यावेळी सौमित्र तिजारे, विशाल बोराडे, आशुतोष प्रभावळकर, पराग जोशी, रमेश पसारी, नरेंद्र सतिजा, रवींद्र बोकारे, मयुरेश गोखले, अनिरुद्ध जोशी, विजू चांदे, समीर कोतवालीवाले या सर्व भावांचे आणि त्यांच्यासोबत प्रभावळकर, प्रीती केकतपुरे, स्वरा करंजगावकर यांचे सहकार्य लाभले
तृतीयपंथी आपल्याचसारखे
तृतीयपंथीयांसाठी काम करणाèया श्रद्धा जोशी म्हणतात, तृतीयपंथी मानवापासून वेगळे नाहीत. तेही आपल्याचसारखे आहेत, असा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले. समाजाने आजही त्यांना स्वीकारलेले नाही. समाजात त्यांना योग्य स्थान मिळालेले नाही. त्यामुळेच समाजाच्या मुख्य प्रवाहात ते दिसत नाहीत. समाजाने त्यांना स्वीकारावे, त्यांना यथोचित मान द्यावा, एवढीच साधी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
त्यांना सोबत घेऊन चला
त्यांची काहीच चूक नाही. तो तर निसर्गाचा दोष आहे. निसर्गाने आधीच त्यांच्यावर अन्याय केलेला आहे, आता समाजाने करू नये. त्यांना गरज आहे समाजाच्या सहकार्याची. त्यांना सोबत घेऊन चला, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक मयुरेश गोखले यांनी केले. त्यांना पैसा, प्रसिद्धी आणि सहानुभूती नको. केवळ समाजाची साथ हवी, असेही ते म्हणाले.