गांधीसागर तलावातील हजारो मासे मृत

    दिनांक :12-Aug-2020
|
-ऑक्सिजन मात्रा कमी होण्याची शक्यता
नागपूर,
गांधीसागर म्हणजे शुक्रवारी तलावातील हजारो मासे मृत पावले आहेत. सकाळी पाण्यावर तरंगांना मासे दिसत आले असून, मासे कशामुळे मृत झाले? याचे कारण अद्याप कळले नाही. मात्र, तलावातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने मासे मृत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

machhi _1  H x  
 
गांधीसागर अर्थात शुक्रवारी तलाव एरवी आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध आहे. मात्र, हाच तलाव आता जलचर प्राण्यांच्याही जिवावर उठला आहे. पर्यावरणप्रेमी, संस्था, संघटना आणि मनपा प्रशासनाच्या आवाहनांकडे दुर्लक्ष करुन नागपूरकरांनी केलेल्या हटवादी कृतीमुळे मुक्या जीवांवर ही वेळ ओढवली. कुणालाच न जुमानता नागरिक तलावात कचरा टाकत असतात.
 
त्यामुळे जलस्रोत प्रदूषित होत आहेत. पाण्यातील स्वच्छतादूत असलेल्या माशांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. श्रद्धेचा अतिरेक करणार्‍या हटवादी भाविक निर्माल्यही पाण्यात टाकतात. देवी देवतांच्या मूर्त्या विसर्जित करतात. परिणामी, तलावातल्या हजारो माशांना हकनाक प्राण गमवावे लागले. निसर्गाच्या साखळीत मासे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी महत्त्वाचा घटक मानले जातात.
 
दुर्दैवाने येथील कचरा या स्वच्छतादूतांच्या जिवावर उठल्याने नैसर्गिक साखळी खंडित होऊन रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. शिक्षक सहकाही बॅँकेसमोरील पागे उद्यानाला लागून तलावाच्या काठावर हजारो माशांचे मृतदेह पाण्यावर तरंगत आहेत. रात्रभरात संपुर्ण तलावातील हजारो मासे मृत पावल्याचे आज पहाटे माहित झाले. सकाळपासून मृत मासे काढण्याचे काम केले असता अंदाजे 2 ते 3 क्विंटल मासे मृत पावल्याचे दिसून आले. मासे अचानक मरण पावल्यामुळे कुणीतरी जाणूनबुजून विषारी रसायन टाकले असावे किंवा ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यामुळे मासे मृत्यू पावले असावे, असा अंदाज बांधला जात आहे.
नीरीने घेतले पाण्याचे नमूने-श्वेता बॅनर्जी
गांधीसागर तलावातील शेकडो मासे मृत आढळून आले ही खरी गोष्ट आहे. मात्र, मासे कशामुळे मृत पावले हे अद्याप कळू शकले नाही. नीरीने तलावातील पाण्याचे नमूने तपासणीसाठी नेलेले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर खरे कारण कळेल, असे मनपाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी सांगितले.