गृहविलगिकरणात २३१८ कोरोनाबाधित

    दिनांक :13-Aug-2020
|
- दिशानिर्देशांचे पालन कितपत होतेय?
नागपूर,
नागपूर शहर व ग्रामीणसह जिल्ह्यात एकूण २३१८ कोरोनाबाधित गृहविलगिकरणात असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकांद्वारे निरंतर लक्ष ठेवले जात आहे.
 
home quarantine_1 &n 
 
गृहविलगिकरणाचा साधारण १४ दिवसांचा कालावधी असून गृहविलगिकरणातील बाधितांच्या संख्येत रोज बदल होत असतो. कुणाचे गृहविलगिकरण संपते तर कुणाचे सुरू होत असते. मुळात गृहविलगिकरण (होम आयसोलेशन) व अलगीकरण (क्वारंटाईन) यात किंचित फरक असला तरी प्रत्यक्षात घरातील इतर सदस्यांपासून स्वतंत्रच रहायचे असते. गृहविलगिकरणाची बुधवार सायंकाळी स्थिती म्हणजे २३१८ गृहविलगिकरणात होते.
 
 
कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केले जाते ते गृहविलगिकरण. सखोल वैद्यकीय तपासणीअंती लक्षणे नसलेले, इतर आजार नसलेले, मधुमेह, रक्तदाब असल्यास अत्यंत नगण्य, श्वास घेण्यास त्रास होत नाही, अशा बाधित रुग्णांना गृहविलगिकरणात पाठविले जाते. पण, संबंधितांना विचारूनच. त्यांची घरी जायची इच्छा नसेल तर कोविड केअर केंद्रात पाठविले जाते. याशिवाय बरे झालेल्या बाधितांनाही १४ दिवस गृहविलगिकरणात रहावे लागते.
 
 
बुधवारी सायंकाळी मेडिकलमधून २३७, मेयो २७२, एम्स ८४, आमदार निवास कोविड केअर केंद्र १५३७, वारेगाव १०१, ओरिएंट ग्रँड २, पारडसिंगा काटोल २०, कळमेश्वर १, हिंगणा ९, सावनेर १९, मौदा १७, रामटेक ३, उमरेड १५, नरखेड केंद्रातून १, अशा एकूण २३१८ बाधितांना गृहविलगिकरणाचा आदेश देण्यात आल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले. अर्थात त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले.
 
बाधिताच्या संपर्कात आलेल्यांना किंवा जिल्हाबाहेर जाणाऱ्यांना पण लक्षणे नसलेल्यांना अलगिकरणात (क्वारंटाईन) जाण्यास सांगितले जाते. गृहविलगिकरण व अलगिकरणात असलेल्यांना नियम, काळजी समानच असते. १५ दिवस घराबाहेर पडू नये. घरात स्वतंत्रच रहावे. एकमेकांपासून दूरच रहावे. स्वच्छता निरंतर हवी आदी काळजी प्रत्येकालाच घ्यावी लागते. रुग्णालयात विचारले जाते तेव्हा गृहविलगिकरणाला कुणीच नाही म्हणत नाही. शेवटी रुग्णालयापेक्षा आपले घर प्रत्येकालाच प्रिय असते.
 
मात्र, गृहविलगिकरण व अलगिकरणासाठी संडास-बाथरूम जोडलेली स्वतंत्र खोली अनेक लोकांकडे नाही. बाधितांचे पत्ते प्रशासनाजवळ आहेत. ते रहातात त्या वस्त्यांवर नजर टाकली तर रहाण्यास स्वतंत्र खोली नाही, तसेच इतरही बाबी उघड होतात. दिशानिर्देशाप्रमाणे काळजी घेतली जात नाही व बाधिताच्या संपर्कात येऊन घरातील इतर लोक बाधित होत असल्याचेही प्रशासनापासून लपून राहिलेले नाही.

रुग्णालयांवरील ताण कमी- डॉ. पातुरकर
गृहविलगिकरणाने रुग्णालयांवरील ताण कमी झाला आहे. पूर्वी बाधितांची संख्या कमी असल्याने सर्वप्रकारचे रुग्ण रुग्णालयात असायचे. मात्र बाधितांची संख्या वाढल्याने रुग्णालयावरील ताण वाढला. तो गृहविलगिकरणाने कमी झाला. शिवाय रुग्णालयीन उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना उपचार मिळतोय. गृहविलगिकरणातील रुग्णांवरही आरोग्य पथकाचे लक्ष असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी सांगितले.