दिवसभर पावसाची रिपरिप

    दिनांक :13-Aug-2020
|
- खरीप पिके आली बहरून
- आल्हाददायक वातावरण
नागपूर, 
गेल्या आठवडाभरापासून पाऊस दररोज हजेरी लावत आहे. मात्र, गुरुवारी पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. चार, पाच दिवसातील या पावसामुळे खरीपातील पिकेही चांगलीच बहरली असून, शहरासह जिल्ह्यात आल्हाददायक वातावरण आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील धरणे लबालब भरली असून, काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
 
 
nagpur rain_1  
 
यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. जुलै महिन्यात पावसाने बराच उघाड दिला होता. त्यामुळे भाताची रोवणी खोळंबली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावणे सुरू केले आहे. काही भागांत जोरदार, तर काही भागात हलका पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तळी, ओढे, नाले पाण्याने भरुन वाहत आहेत. गुरुवारच्या पहाटेपासूनच पावसाने रिपरिप सुरू केली. पावसाची संततधार सुरू असल्याने शेतात चिखल झाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांची कामे बंद होती. शहरी भागात सातत्याने पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे चाकरमान्यांची काहीअंशी धांदल उडाली होती. गेल्या काही दिवसांपासून सूर्यनारायणाचे दर्शन झालेच नाही. दुसरीकडे सततच्या रिमझिम पावसामुळे काही लोक घरात बसूनच होते. नोकरी-धंद्यासाठी बाहेर पडलेल्या लोकांची मात्र सातत्याने कोसळणार्‍या या संततधार पावसामुळे चांगलीच धांदल उडाली.
 
 
खरिपाच्या पिकांना हा पाऊस लाभदायक ठरत असला तरी सध्या कोळपणी आणि खुरपणीची कामे नसल्याने पिकांमध्ये इतर तण माजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रावणात पावसाच्या सरीमागून सरी कोसळत असल्याने शहरवासीयांनीही पावसाचा आनंद घेतला. गोकुळाष्टमीच्या पूर्वसंध्येला पावसाने शिडकावा केल्याने चैतन्याचे वातावरण आहे. मंगळवारीही शहरात अनेक ठिकाणी भीज पाऊस झाला. दरम्यान, नागपूर वेधशाळेने सकाळी 8.30 पर्यंत 30.5 मिलीमीटर पावसाची नोंद केली. मृग नक्षत्रात ऐन पेरणीच्या वेळेतच चांगला पाऊस बरसल्याने शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण होते. तेव्हापासून आजवर सर्वच नक्षत्रात पावसाची बरसात झाली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शहर आणि जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे.
 
 
शहर व जिल्ह्यात सकाळपासूनच पाऊस सुरू आहे. पावसाला जोर नसला तरी सातत्याने पडणार्‍या पावसामुळे जनजीवन काहीअंशी विस्कळीत झाले होते. दिवसभर पाऊस पडला असला तरी भुरभुर पडणार्‍या पावसामुळे शहरात केवळ 30.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.