बाधितांमध्ये नवे ७२७ रुग्ण, फक्त ४७.११ टक्के बरे

    दिनांक :13-Aug-2020
|
-एकूण बाधित ११७०९
-कोरोनामुक्त ५५१६
-एकूण मृत्यू ४२०
नागपूर, 
नागपुरात रॅपिड अँटिजेन चाचणी उपयोगाची ठरत असून वेगाने आणि मोठ्या संख्येने बाधित निष्पन्न होत आहेत. अतिगंभीर परिस्थिती उद्भवण्याआधीच उपचार करणे शक्य झाले. मागील २४ तासात चाचण्यांच्या इतर पद्धतीच्या तुलनेत या पद्धतीने सर्वाधिक ३०१ बाधित उघड झाले आहेत. आज एकूण ७२७ बाधितांची नोंद झाली असून आतापर्यंत बाधितांची संख्या ११७०९वर पोहोचली. १८ मृत्यू होऊन एकूण मृत्यूची संख्या ४२० झाली. कोरोनामुक्ती केवळ ४७.११ टक्के इतकी कमी होती.
 

corona_1  H x W 
 
आरटी-पीसीआर यंत्रावर कोविड चाचणीस ४ ते ५ तास, ट्रुनॅट यंत्राने ४० ते ६० मिनिटे चाचणीस लागतात. रॅपिड अँटिजेन पद्धतीने चाचणी घशातील स्रावाचा नमुना घेतल्यावर एक तासात करावी लागते. १५ ते ३० मिनिटात अहवाल मिळतो. नुसत्या डोळ्याने ही चाचणी करता येते. यामध्ये नकारात्मक निदान ९९.३ ते १०० टक्के तसेच सकारात्मक निदान ५०.६ ते ८४ टक्के आहे.
 
 
या चाचणीसाठी केवळ ४५० रुपये खर्च येतो. वेळही वाचतो. एक किट एकदाच उपयोगात येते. प्रतिबंधित क्षेत्र, शासकीय रुग्णालयातील फ्ल्यूसदृश तसेच अतिजोखमीच्या व्यक्तीच्या संपर्कातील लक्षणे नसलेल्या, इतरांमध्ये हृदयविकार, फुफ्फुस, यकृत, मूत्रqपड, मधुमेह, रक्तदाब आदी विकार, त्याचप्रमाणे केमोथेरपी, एचआयव्ही बाधित, अवयव प्रत्यारोपण केलेले वृद्ध, गरोदर महिला आदी तातडीच्या उपचारांची आवशक्ता असलेल्या रुग्णांसाठी रॅपिड अँटिजेन चाचणी उपयोगी आहे. या पद्धतीमुळे बाधित आणि इतरही आजारी रुग्णांची संख्याही एकदम वाढू लागली.
 
 
सायंकाळी ५ वाजता उपलब्ध माहितीनुसार, आज ग्रामीणमध्ये १०४९ व शहरात १७२५ नमुने तपासले गेले. त्यात अँटिजेन पद्धतीने ३०१, इतर पद्धतींनी मेयो प्रयोगशाळेत १०३, मेडिकल ९१, एम्स ५६, नीरी ३२, पशुवैद्यकीय ३८, खाजगी प्रयोगशाळेत १०६, असे एकूण ७२७ नमुने सकारात्मक आले. त्यामुळे बाधितांची संख्या एकूण ११७०९ झाली. त्यात ३४६५ ग्रामीणचे आहेत.
 
 
रुग्णालय व कोविड केअर केंद्रात प्रत्यक्ष ३३०० बाधित उपचार घेत आहेत. २४७३ रुग्णांना गृहविलगिकरणात पाठवण्यात आले. सर्वाधिक ३६७ रुग्ण मेडिकलमध्ये व त्याखालोखाल १८९ रुग्ण मेयोत उपचार घेत आहेत. सेवन स्टारमध्ये ६१, होप ५९, लता मंगेशकर रुग्णालयात ५८, रेडियन्स४५, वोक्हार्ट ४१, ऑरेंज सिटीत ३१ बाधित दाखल आहेत. सौम्य लक्षणे असलेले सर्वाधिक २०४ बाधित रुग्ण आमदार निवास कोविड केअर केंद्रात आहेत. त्याखालोखाल व्हीएनआयटी २०२ आहेत. १६५७ दाखल होण्याच्या प्रतीक्षेत होते.
 
 
बाधितांच्या मृत्यू संख्येने चार शतके पूर्ण केली आहेत. मागील २४ तासात मेडिकल रुग्णालयात ११, मेयो ९, असे २० मृत्यू झाले. त्यात ग्रामीणमधील १ व शहरातील १६ तसेच जिल्ह्याबाहेरील १ रुग्णाचा समावेश आहे. मृत्यूची एकूण संख्या ४२० झाली आहे.