वन विभागाकडून ब्रिटिशकालीन रस्ता बंद

    दिनांक :13-Aug-2020
|
- शेतकर्‍यांची रस्त्याअभावी फरपट
तभा वृत्तसेवा
महागाव, 
तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेला फुलिंसगनगर, सारखणी हा रस्ता शेतकर्‍यांना फायद्याचा ठरत होता. वन विभागाने पूर्वीपासून अस्तित्वात असलेला रस्ता बंद केल्याने शेतकर्‍यांना शेतात बियाणे, खते नेण्यासाठी अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे हा रस्ता मोकळा करण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील शेतकर्‍यांनी तहसीलदारांकडे निवेदनातून केली आहे.
 

forest Road_1   
 
तालुक्यातील फुलिंसगनगर, सारखणी ही गावे येत असून, याच मार्गावर शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी ब्रिटिशकालीन रस्ता होता. वन विभागाने हा रस्ता कायमचा बंद केल्याने या वर्षीच्या रस्त्याअभावी खरीप हंगाम हातातून गेला आहे. या ठिकाणी रस्त्याच्या ठिकाणी रोपवाटिका केल्याने आता शेतात कोणत्या मार्गाने जावे असा प्रश्र्न शेतकर्‍यांना पडला आहे.
 
 
या शिवारामध्ये पुरातन शिवमंदिर असून पुसद, महागाव, उमरखेड तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने तिथे दर्शनासाठी येतात. गुडीपाडवा, बारस, श्रावण महिन्यात येथे भागवत कीर्तन महापंगत महाप्रसादाचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. श्रावण महिन्यात यात्रादेखील भरते. रस्ता बंद झाल्याने भक्तांचा हिरमोड झाला आहे. हिंदू  संस्कृती मोडीत काढण्याची प्रथा बंद करण्याचा घाट वन विभागाने घातला आहे, असा आरोप होत आहे.
 
 
शेतकर्‍यांसह भाविकांचे नुकसान होऊ नये म्हणून हा रस्ता वन विभागाने तत्काळ मोकळा करावा, अन्यथा न्याय मिळेपर्यंत आक्रोश आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदारांमार्फत वनमंत्र्यांना पाठवण्यात आले. शेतकरी नेते मनीष जाधव, यमिंसग राठोड, वसंत चव्हाण, जयिंसग राठोड, विठ्ठल आडे, श्रीराम आडे, अमरिंसग जाधव, धर्मा जाधव, उत्तम राठोड, ज्ञानेश्वर जाधव, सुमन जाधव यांच्या सह्या आहेत.