यवतमाळात दोघांचा कोरोना मृत्यू

    दिनांक :13-Aug-2020
|
74 जण नवे करोनाबाधित : 66 जणांना सुट्टी
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
जिल्ह्यात गुरुवार, 13 ऑगस्ट रोजी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोनाबळी 53 झाले आहेत. तर 24 तासांत नव्याने 74 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच विविध कोव्हिड केंद्रांमध्ये भरती असलेले 66 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
 


corona_1  H x W
 
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील दलित सोसायटीतील 61 वर्षीय पुरुष आणि दारव्हा शहरातील शिवाजीनगर येथील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने बाधित आलेल्या 74 जणांमध्ये 46 पुरुष आणि 28 महिला आहेत.
 
 
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू आणि बर्‍या झालेल्या 66 जणांना सुट्टी झाल्यामुळे सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या 630 आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2032 झाली आहे. यापैकी 1347 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 53 मृत्युंची नोंद आहे.
 
 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 32839 स्राव नमुने पाठविले आहेत. यापैकी 32222 प्राप्त तर 617 अप्राप्त आहेत. तसेच 30190 नागरिकांचे नमुने आतापर्यंत कोरोनामुक्त आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
विजेच्या धक्क्याने शेतमजुराचा मृत्यू
वणी : वणी तालुक्यातील शिरपूर पोलिस ठाण्यांतर्गत नवरगाव (उमरी) येथे विजेच्या धक्क्याने एका शेतमजुराचा मृत्यू झाला. विलास मोहुर्ले (43, रा. खेडी ता. सावली जि. चंद्रपूर) असे मृतकाचे नाव आहे. विलास हे परिवारासह वणी तालुक्यातील नवरगाव (उमरी) येथे प्रभाकर भोयर यांच्या शेतात मजूर म्हणून अंदाजे दहा वर्षांपासून कामावर आहेत.
गुरुवार, 13 ऑगस्टला दुपारी 2 च्या सुमारास शेतातील विद्युत तार जमिनीवर पडून होते. त्या तारांमध्ये शेतातील पाळीव कुत्रा फसला असता त्याला वाचविण्यासाठी विलास गेले होता. कुत्र्याला वाचवताना जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने विलासचा मृत्यू झाला.