व्यापार्‍यांची कोरोना चाचणी, महापौरांचा विरोध

    दिनांक :13-Aug-2020
|
- मुंढे साहेब, जनतेला वेठीस धरू नका
- संदीप जोशी मनपा आयुक्तांवर उखडले
नागपूर,
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील दुकानदार, व्यापार्‍यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले असून, यास महापौर संदीप जोशी यांनी विरोध दर्शविला. मुंढे साहेब, असे चुकीचे निर्णय घेऊन जनतेला वेठीस धरू नका, असा विनंती त्यांनी केली आहे.
 
 
CORONA_1  H x W
 
पत्रकारांशी बोलताना महापौर जोशी म्हणाले, आयुक्त मुंढे हे वास्तविकतेला धरून निर्णय घेत नाही. सेंट्रल एव्हन्यू रोड ऐसपैस आहेत. तिथे कशाला समविषमचा नियम लागू होतो. इतवारी, मस्कासाथ, चितारओळी येथे हा निर्णय लागू होतो. टाळेबंदीमुळे सध्या व्यवसाय ठप्पच आहेत. व्यापार्‍यांची आर्थिक स्थिती डबघाईस आलेली आहे. अनेकांच्या नोकर्‍या, रोजगार गेलेला आहे. त्यामुळे वर्षभरासाठी पाणी दरवाढ मागे घ्यावी, अशी विनंती केली तर बिघडलं कुठं? परंतु, जनतेच्या सुख दु:खाशी आयुक्तांना काहीही देणेघेेणे वाटत नाही. मी नागपूरचा प्रथम नागरिक आहे. नागपुरकरांशी माझी नाळ जुळली आहे. त्यामुळे जनतेवर होणारा अन्याय मी खपवून घेणार नाही. आयुक्त जर असेच चुकीचे निर्णय घेत असतील तर जनतेसोबत रस्त्यांवर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.
 
 
बर्डीवरील व्यापार्‍यांचा दररोज 4 ते 5 लाखांचा व्यवसाय व्हायचा. सध्या केवळ 18 हजारांची विक्री होत आहे. त्यात कामगारांचे वेतन, खोलीचे भाडे, विजेचे बिलही भरावे लागते. व्यापारीही अडचणीत आलेला आहे. त्यामुळे व्यापार्‍यांना कोरोना चाचणी स्वखर्चाने बंधनकारक करणे संयुक्तिक नाही. तसेच दुकानात काम करणार्‍या कामगारांच्या चाचणीचा भारही व्यापार्‍यांना उचलणे शक्य नाही. शहरात 50 हजार व्यावसायिक आहेत. व्यवसायिकांकडे काम करणारे कामगार असे एकूण 4 ते 5 लाखांची संख्या होते. मनपाकडे दररोज 3 हजार चाचण्याची क्षमता आहे. सहा दिवसांत 5 लाख चाचण्या करणे शक्य आहे का? यावर 85 कोटी खर्च येणार आहे. त्यामुळे मनात आले तसे निर्णय घेऊ नका. आज निगेटिव्ह आलेला व्यक्ती उद्या निगेटिव्ह राहिलच हे सांगता येणार नाही. त्यामुळे कशाला उगीचच व्यापार्‍यांना वेठीस धरता. असले उद्योग बंद करा, अशा शब्दात महापौरांनी आयुक्तांना सुनावले.
 

सभेत पाणी दरवाढ रद्दचा प्रस्ताव
महानगरपालिकेची आभासी सर्वसाधारण सभा येत्या 20 ऑगस्ट रोजी होत आहे. या सभेत सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी पाणी दरवाढ रद्दचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करून ठराव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला जाईल, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिले.
 
तानाजी वनवेंकडून मुंढेंंची पाठराखण
व्यापार्‍यांना कोरोना चाचणी करण्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंधनकारक केले आहे. 18 ऑगस्टपर्यंत चाचणी करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रतिष्ठानाचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. मुंढे यांच्या या निर्णयाचा महापौरांनी कडाडून विरोध केला असताना विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी मुंढेंची पाठराखण केली आहे. व्यापार्‍यांकडे दररोज शेकडो ग्राहक जात असतात. व्यापार्‍यांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे व्यापार्‍यांनी कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे, असे तानाजी वनवे यांनी म्हटले आहे.