खासगी शिक्षक, कर्मचार्‍यांचे शोषण

    दिनांक :13-Aug-2020
|
- टाळेबंदीपासून मानधन देणे बंद
- कर्मचार्‍यांवर उपासमारीचे संकट
नागपूर,
कोरोनाचा वाढत्या प्रकोपामुळे राज्यात टाळेबंदी सुरू आहे. शाळा-महाविद्यालये बंद असून खासगी संस्थाचालकांनी शिक्षक, कर्मचार्‍यांचे मानधन देणे बंद केले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले आहे.
 
 
TECHER_1  H x W
 
मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रकोप वाढू लागला. त्यामुळे केंद्र शासनाने 22 मार्चपासून संचारबंदीसह टाळेबंदी लावली होती. तीन महिने सर्व व्यवहार ठप्पच होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. हाताला काम नसल्यामुळे परप्रांतिय कामगार आपल्या राज्यात परत गेले. गेल्या मार्चपासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा वगळता इतर कुठल्याच परीक्षा झालेल्या नाही. ऐन परीक्षेच्या काळात टाळेबंदी सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मोठा फटका बसला. वर्षअखेरीस मोठ्या प्रमाणात शालेय शुल्क विद्यार्थ्यांकडे शिल्लक राहिल्याने आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित वर्गांवर शिकवणारे बहुतांश शिक्षक मार्चपासून विनापगारी आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे परिस्थिती कधी सुधारेल याबाबत अनिश्चितता आहे. अनेकांनी संसाराचा गाडा सुरू ठेवण्यासाठी भाजीविक्री, दुकानांत काम करणे सुरू केले आहे. तर काही शिक्षक-कर्मचार्‍यांनी गावाची वाट धरत शेतीत निंदणी, खुरपणी सुरू केली आहे. शाळेच्या वेळानंतर खासगी शिकवणी वर्गातून थोडेफार पैसे मिळत होते, त्यावर उपजीविका होत होती. मात्र, कोरोनामुळे शाळा व शिकवणी बंद असल्यामुळे संसाराची घडीच विस्कटली आहे. घराचे भाडे, दुकानदारांची थकबाकी वाढली आहे, काय करावे सुचत नाही, सध्या मिळेल त्या ठिकाणी कामाला जात आहे, असे एका खासगी शाळेतील शिक्षकाने सांगितले.
 
 
कोरोनामुळे कायम विनाअनुदानित शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे या शाळांवर कार्यरत असलेल्या सुमारे हजारो शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.