मेळघाटातील ब्रॉडगेजसाठी ग्रामसभांचे होणार ठराव

    दिनांक :13-Aug-2020
|
15 ऑगस्टला होणार सभा
मुद्दा झाला प्रतिष्ठेचा
तभा वृत्तसेवा
धारणी, 
अकोला-खंडवा ब्रॉडगेज रेल्वे विस्तारित लाईन पूर्ववत म्हणजे मेळघाटातूनच घेण्यात यावी, या मागणीसाठी येत्या 15 ऑगस्ट रोजी धारणी पंचायत समितीतील अनेक ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत ठराव घेण्याची तयारी धुळघाटचे सरपंच राम भिलावेकर यांनी केल्याने आता खर्‍या अर्थाने रेल्वेचा मुद्दा मेळघाटसाठी प्रतिष्ठेचा झालेला आहे. 12 ऑगस्ट रोजी भाजपाचे प्रा. दिनेश सूर्यवंशी व गजानन कोल्हे, अप्पा पाटील यांच्या उपस्थितीत 5 गावांच्या लोकांनी ठराव घेण्याचा निर्णय घेतला.
 
 
Amt 1_1  H x W:
 
 
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य वन्यजीव मंडळाने मेळघाटला वगळून जुन्या लाईनवरील वान, डाबका, धुळघाट स्टेशन वगळून नवीन संग्रामपूर तथा जळगाव जामोद (बुलडाणा जिल्हा) या मार्गाने विस्तारित ब्रॉडगेज लाईन घेण्याचा निर्णय घेतल्याने मेळघाटातील सर्वच स्तरावरून या निर्णयाचा निषेध केला जात आहे. या मुद्यावर प्रसार माध्यमातून नाराजीचा सूर सुरू असतांनाच आता थेट रेल्वे धुळघाटचे सरपंच राम भिलावेकर यांनी आंदोलनाला सुरुवात केल्याने जनतेच्या स्तरावरील विरोधाची प्रक्रिया सुरु झालेली आहे. भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. दिनेश सूर्यवंशी, ज्येष्ठ नेते गजानन कोल्हे, माजी तालुकाध्यक्ष आप्पा पाटील, आशीष शर्मा, बिलवे, विकी नवलाखे यांनी ब्रॉडगेज विषयी आदिवासींचे मत समजण्यासाठी धुळघाट रेल्वे, डाबका, शिवाझिरी, गोलाई, सुसर्दा, राणीगाव, कंजोली, मोथाखेडा यासह अनेक गावांना भेटी देत आदिवासींसोबत विविध विषयांवर चर्चा केली. सर्वाधिक प्रभावित धुळघाट रेल्वे येथील समाज मंदिरात सरपंच राम भिलावेकर यांच्या अध्यक्षतेत पाच गावातील लोकांची बैठक पार पडली.
 
यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. सूर्यवंशी, गजानन कोल्हे, आप्पा पाटील, धोंडीबा मुंडे, गोविंद मुंडे, दिलीप वसू, तारासिंग कास्देकर, अशोक मावस्कर गोविंद मुंडे, भगवान मुंडे, रामविलास दहिकर, भीमराव जावरकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ब्रॉडगेज लाईनचा मार्ग कोणत्याही परिस्थितीत बदलू देणार नाही, अशी भूमिका प्रा. सूर्यवंशी यांनी मांडतांना मेळघाटला राष्ट्रीय रेल्वे मानचित्रातून पुसण्याचा डाव हाणून पाडण्यात येईल, असा खणखणीत इशारा तथाकथित पर्यावरण प्रेमी व भूमाफियांना दिला. अमरावती जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या मेळघाटला वगळून बुलडाणा जिल्ह्याला लाभ देण्याचे प्रयत्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, असा पवित्रा गजानन कोल्हे यांनी बोलून दाखविला. या प्रकरणाविषयी प्रभावित लोक अमरावतीतही आपला मुद्दा लवकरच मांडतील, असे आप्पा पाटील यांनी सांगितले.
 
पहिला टप्पा ग्रामसभेचा ठराव
1954 पासून सुरु असलेल्या मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन जुन्या म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून करण्यात यावे, या केंद्रीय शासनाच्या निर्णयाचे समर्थनात 15 ऑगस्ट रोजी अनेक ग्राम पंचायतीत ठराव घेण्याचा निर्णय धुळघाटचे सरपंच राम भिलावेकर यांनी यावेळी घोषित केला. विस्तारित मार्गातून मेळघाटला वगळण्याच्या राज्य सरकारच्या हालचालींचा सरळ विरोध आता जनतेतून सुरु झालेला आहे. सभेनंतर पाहुण्यांनी ऐतिहासिक चारचा आकडा व रेल्वे स्टेशनची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मेळघाटातून ब्रॉडगेज लाईन घेण्याचा आग्रही ठराव घेण्यात येईल, असे भिलावेकर यांनी सांगतांना या विषयावर जनमत घेण्याचे आवाहन केले.