कोरोनामुळे मज्जासंस्थेत बिघाड होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे : डॉ. हर्षल राठोड

    दिनांक :13-Aug-2020
|
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
कोरोनाबाधित रुग्णांना आजाराशी संघर्ष असताना मेंदू विकारांशी लढण्यासाठीदेखील आता सज्ज राहिले पाहिजे, असा इशारा यवतमाळचे सुप्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ (न्युरोलॉजिस्ट) डॉ. हर्षल राठोड यांनी दिला आहे. कोरोना आणि मज्जासंस्था विकार अथवा मेंदूविकार यासंबंधी वरील विधान करताना त्यांनी जगभरातील विविध देशात कोरोना आजाराची लक्षणे आणि मज्जासंस्था विकार या अनुषंगाने सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा आधार घेतला आहे.
 

Rathod_1  H x W 
 
जगभरात रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लाखो रुग्णांपैकी निम्म्यापेक्षा अधिक रुग्णांत डोके दुखणे, वास व चव घेण्याच्या क्षमतेचा र्‍हास होणे, शुद्ध हरवणे, स्नायू कमजोर होऊन अंग दुखणे, भोवळ येणे, पक्षघात अशा प्रकारची मज्जासंस्थेशी निगडित लक्षणे ठळकपणे आढळली आहेत. अमेरिका, जर्मन, इटली, इस्राईल आणि भारतात देखील या अनुषंगाने केलेल्या अभ्यासात ही बाब स्पष्ट झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी ही बाब लक्षात घेऊनच उपचार करावेत आणि गरज भासल्यास न्युरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा, जेणेकरून रुग्णांचा उपचार योग्य दिशेने त्यांना करता येण्यास मदत होईल आणि मज्जासंस्थेत बिघाड होण्यापासून रुग्णांचा बचाव करता येईल असे डॉ. राठोड यांनी सुचविले आहे.
 
 
कोरोना पीडित रुग्णाला कोविड-19 चा संसर्ग होण्याआधी त्यांना सारीचा संसर्ग झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सारीच्या आजारात मज्जासंस्थेशी निगडित वरील लक्षणे विशेषत्वेकरून असतात आणि पुढे मग तो रुग्ण कोरोनाग्रस्त झाल्यावर ताप, सुका खोकला, श्वासोच्छ्‌वासात अडथळा निर्माण होणे इत्यादी कोरोनाची लक्षणे दिसू लागतात, असे मत अमेरिकी शास्त्रज्ञ इगॉर कोराल्निक यांनी मांडले आहे.
 
 
कोराल्निक यांच्या मतानुसार कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना वरील बाब लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्या मते कोविडमुळे मध्यवर्ती मज्जासंस्था पूर्णत: निकामी होणे देखील शक्य असून असे झाल्यास पाठीचा कणा, मेंदू, तुमच्या स्नायूंनादेखील इजा होऊ शकते. कोरोनामुळे मेंदूला प्राणवायूचा योग्य पुरवठा न होणे, मेंदूला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांत गुठळ्या होणे, परिणामी रुग्णाला पक्षाघात होणे आणि त्यामुळे प्रसंगी मृत्युदेखील संभवतो, असे डॉ. राठोड यांनी लक्षात आणून दिले आहे.
 
 
कोरोनामुळे उद्भवणार्‍या संभाव्य मेंदूविकाराचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व सामान्यत: कोरोनाग्रस्त रुग्णांनी जी दक्षता घेणे आवश्यक असते तीच दक्षता या बाबतीत घेणे गरजेचे आहे. जीवनसत्व क, ड, प्रथिने तसेच िंझकया खनिजांचा आपल्या नित्य आहारात अंतर्भाव असावा यासाठी अंडी, मासे, िंलबू, फळे, कोबी इत्यादी जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जीवनसत्व ड विशिष्ट प्रकारचे मासे, चीज, अंडी यामध्ये सापडते. सकाळचे कोवळे ऊन या जीवनसत्वाचा उत्तम स्रोेत आहे. िंझक हे खनिज द्रव्य मटन, चिकन, सुकामेवा इत्यादींपासून मिळू शकते.
 
 
आहारात वरील पदार्थांचा समावेश केल्याने प्रतिकारशक्ती वाढून इतर आजारांचा सामना करण्यास सक्षम बनते. यामध्ये मास्कचा वापर, परस्परात भौतिक दूरत्व, निर्जंतुकीकरण हे शिष्टाचार पाळणेही आवश्यक आहे. तसेच पुरेसा व्यायाम करणे आणि विश्रांती ही घेणे हेदेखील गरजेचे आहे, असे डॉ. हर्षल राठोड यांनी म्हटले आहे.
 
 
वरील जीवनसत्वे आणि शिष्टाचाराची अनिवार्यता कोरोनाचा संसर्ग होण्याआधी आणि झाल्यानंतरही महत्वाची आहे. कोरोनामुळे जडलेले मेंदुविकार नियंत्रणाबाहेर जाऊ नयेत याकरिता तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यानुसार एमआरआय आदि तपासण्या करण्याची व त्यानुसार औषधोपचार करण्याची काही प्रकरणात गरज भासू शकते, असेही मेंदुविकार तज्ज्ञ डॉ. हर्षल राठोड यांनी सांगितले.