भोयर येथे प्रेमप्रकरणातून युवकाचा खून

    दिनांक :13-Aug-2020
|
- मध्यरात्री झोपेतच केला हल्ला
यवतमाळ, 
प्रेम प्रकरणातून एका 34 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी 11 ऑगस्टला रात्री 1 वाजताच्या सुमारास शहरालगतच्या भोयर येथे घडली. गणेश शंकर टेकाम (वय 34, रा. भोयर, यवतमाळ) असे मृताचे नाव आहे.
 

Knife_1  H x W: 
 
दहा वर्षांपूर्वी दारव्हा तालुक्यातील चाणी कामठवाडा येथील रंगराव घोटेकर याचा भाग्यश्री हिच्यासोबत विवाह झाला असून त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. वर्षभरापूर्वी भाग्यश्री हिचे सूत यवतमाळ तालुक्यातील भोयर येथील गणेश टेकाम याच्याशी जुळले. दरम्यान भाग्यश्री आणि गणेश दोघेही भोयर येथे राहत होते.
 
 
मंगळवारी दोघेही मजुरीच्या कामावरून संध्याकाळी घरी आले. संध्याकाळी 7 च्या सुमारास रंगराव घोटेकर हा भोयर येथील गणेश टेकाम याच्या घरी आला. यावेळी तू माझ्या बायकोला का ठेवले, या कारणावरून गणेश याच्याशी वाद करून जिवाने मारण्याची धमकी देवून निघून गेला.
 
 
दरम्यान रात्री 1 वाजताच्या सुमारास परत भोयर येथे येऊन गणेशच्या दरवाजाला लाथ मारून घरात घुसला. यावेळी झोपून असलेल्या गणेशच्या छातीवर बसून बुक्कीने त्याच्या छातीवर मारहाण केली. यात गणेश गंभीर जखमी झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान गणेश टेकाम याचा रुग्णालयात मृत्यू झाला.
 
 
या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास ठाणेदार संजय शिरभाते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
 
 
‘त्या’ खून प्रकरणातील दोघांना गुरुवारपर्यंत कोठडी
अनैतिक संबंधात अडथळा होत असलेल्या मुलाला प्रियकराच्या मदतीने सावत्र आईने संपवल्याची घटना नेर तालुक्यातील मोझर येथे दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. या प्रकरणी नेर पोलिसांनी सावत्र आई शोभा दमडू चव्हाण (वय 50) आणि तिचा प्रियकर नरेंद्र ज्ञानेश्र्वर ढेंगाळे (वय 42) या दोघांना अटक केली होती. दरम्यान या दोन्ही मारेकर्‍यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कमलेश चव्हाण (वय 32) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रशांत मसराम यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.