सौदी अरबकडून आता पाकिस्तानला कर्ज, इंधन नाही

    दिनांक :13-Aug-2020
|
-भारतविरोधी भूमिका घेण्यास बाध्य करत असल्याचे कारण
रियाध,
पाकिस्तानला पुढील काळात कर्ज तसेच तेलाचा पुरवठा करणार नसल्याचे सौदी अरबने जाहीर केले आहे. काश्मीर प्रश्नावर भारताविरोधात भूमिका न घेतल्याबद्दल सौदी अरबच्या अध्यक्षतेखालील ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनला (ओआयसी) पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी निर्वाणीचा इशारा दिला होता.
 
 
Pakistan-Saudi Arabia_1&n
 
सूत्रानुसार, सौदी अरबला पाकिस्तानने एक अब्ज डॉलर देणे बाकी आहे. सौदी अरबने पाकिस्तानला 2018 मध्ये 6.2 अब्ज डॉलर्सची मदत देण्याचे ठरवले होते. यातील तीन अब्ज रुपयांचे कर्ज आणि 3.2 अब्ज डॉलर्स तेल पुरवठ्याच्या स्वरूपात होते. सौदी अरबचे युवराज मुहम्मद बिन सलमान हे फे ब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेले असताना मदतीसंदर्भातील करारावर स्वाक्षर्‍या झाल्या होत्या. जुलै महिन्यात सौदीचे कर्ज भरण्यासाठी पाकिस्तानने चीनकडून कर्जाऊ रक्कम घेतली होती, हे विशेष.
 
 
परराष्ट्रमंत्री शाह महमुद कुरेशी यांनी प्रसारमाध्यमांना नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, काश्मीरबाबत भारताविरोधात भूमिका घेणे ओआयसी संघटना आणि सौदी अरबला जमणार नसेल तर पाकिस्तान सर्व इस्लामी देशांची स्वतंत्रपणे बैठक बोलावण्याचा विचार करत आहे. भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या मुद्यावर ओआयसी सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक बोलावण्याची मागणी पाकिस्तानकडून सातत्याने करण्यात येत आहे. काश्मीरप्रश्नी इस्लामी देशांमध्येच मतभेद असल्याने संघटनेने ही मागणी अद्याप मनावर घेतलेली नाही.
 
 
दरम्यान, मालदीवने काश्मीरबाबत पाकिस्तानच्या भूमिकेला विरोध केला आहे. या देशाच्या प्रतिनिधी तिल्मिझा हुसेन म्हणाल्या की, इस्लामी विचारसरणीची ढाल करून पाकिस्तान भारताविरोधात रचत असलेले डावपेच अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे दक्षिण आशियातील धार्मिक सलोख्याला तडा जाण्याची भीती आहे.
 
 
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या विधानाने नाराज झालेल्या सौदी अरबची मनधरणी करण्यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा लवकरच सौदी अरबच्या दौर्‍यावर जाण्याची शक्यता आहे. सौदी अरबसारखा पाठीराखा पाकिस्तानने आपल्या मूर्खपणामुळे गमविला, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पाकिस्तानने इराण, तुर्की, मलेशिया यांना हाताशी धरून एक नवा इस्लामी देशांचा गट स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यात त्यांना कितपत यश मिळते, हे आगामी काळात लक्षात येईल.