पायलटांचे विमान पुन्हा काँग्रेसच्या धावपट्‌टीवर!

    दिनांक :13-Aug-2020
|
दिल्ली वार्तापत्र
- श्यामकांत जहागीरदार
\उतरण्याच्या प्रतीक्षेत आकाशात चकरा मारत असलेल्या राजस्थानातील बंडखोर काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या विमानाला ‘खराब हवामाना’मुळे भाजपाच्या धावपट्‌टीवर उतरण्याची परवानगी न मिळाल्यामुळे अखेर नाइलाजाने काँग्रेसच्याच धावपट्‌टीवर उतरावे लागले. आकाशात चकरा मारून पायलटांच्या विमानातील पेट्रोल संपत आले होते, त्यामुळे लवकर विमान धावपट्‌टीवर उतरवले नसते, तर विमानातील प्रवाशांचा जीव (म्हणजे आमदारकी) धोक्यात आली असती, त्यामुळे पायलट यांना कॉंग्रेसच्याच धावपट्‌टीवरून उडालेल्या विमानाचे नाइलाजाने त्याच धावपट्‌टीवर अतिशय कौशल्याने सुरक्षित लॅण्डिंग करावे लागले. विशेष म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वासमोरही, आपल्या धावपट्‌टीवर पायलट यांचे विमान उतरवायची परवानगी देण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता. पायलट यांचे विमान काँग्रेसच्या धावपट्‌टीवर उतरत असताना, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी थोडा अडथळा आणण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण त्यात त्यांना यश आले नाही. खरं म्हणजे पायलट यांचे विमान सुरक्षित उतरल्यामुळे सर्वात जास्त फायदा गहलोत यांचाच झाला आहे. यामुळे सचिन पायलट यांची स्थिती कॉंग्रेसमध्ये ‘सुबह का भुला, शाम को घर लौटा तो भुला नही कहते,’ अशी व्हायला पाहिजे. सचिन पायलट यांना स्वत:ला ‘सुबह का भुला’ समजावे लागणार असले, तरी अशोक गहलोत यांना ते मान्य आहे का, हा खरा प्रश्नच आहे.
 
 
sachin-rahul_1  
 
काँग्रेसच्या नेतृत्वाने पायलट यांच्या घरवापसीसाठी आज जे केले, ते महिनाभरापूर्वीही करता आले असते. मग त्याला महिनाभराचा विलंब का केला, हा प्रश्न आहे. आग लागल्यानंतर विहीर खोदण्याऐवजी आग लागण्यापूर्वी विहीर खोदणे शहाणपणाचे असते. पण, काँग्रेसच्या नेतृत्वाने आधी राजस्थानमध्ये आग लागू दिली, आपल्यापरीने ती भडकवण्याचाही प्रयत्न केला आणि सर्वात शेवटी पक्षाचे व्हायचे ते नुकसान होऊन गेल्यानंतर आग विझवण्याचे नाटक केले.
 
 
मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात नुसते मतभेद नव्हते, तर मनभेदही होते. मतभेद मिटवणे सोपे असते, तर मनभेद मिटवणे अशक्य नसले तरी कठीण असते. त्यासाठी दोन्ही बाजूंची सारखी तयारी असावी लागते. गहलोत गटाच्या आमदारांनी तर बंडखोर आमदांराना पक्षात पुन्हा सामावून घेण्यास विरोध केला, घ्यायचेच असेल त्यांना तर सहा महिने कोणतेही पद देऊ नका, अशी मागणी केल्याचे समजते. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये परतल्यानंतरही सचिन पायलट आणि त्यांच्यासोबतच्या अन्य बंडखोर आमदारांचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही.
 
 
सचिन पायलट यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्याचा निर्णय, राहुल गांधी यांना आपले सहकारी सांभाळता येत नाहीत, अशा नकारात्मक प्रचारापासून वाचवण्यासाठी, कॉंग्रेसला घ्यावा लागला. ज्योतिरादित्य  शिंदे  यांच्यापाठोपाठ सचिन पायलटही पक्ष सोडून गेले असते, तर राहुल गांधी यांची पक्षातील आधीच अडचणीत असलेली स्थिती आणखी अडचणीची झाली असती. या नकारात्मक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर तसेच राहुल गांधींना पुन्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना, त्यांची पक्षातील प्रतिमा उजळवण्यासाठी काँग्रेसच्या महासचिव असलेल्या प्रियांका वढेरा यांनी रक्षाबंधनाची ही आगळीवेगळी भेट आपल्या भावाला दिली. सचिन पायलट यांना काँग्रेसमध्ये परत आणण्यात प्रियांका वढेरा यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती, त्यांच्याच प्रयत्नामुळे सचिन पायलट आणि राहुल गांधी एकमेकांना भेटायला तयार झाले. गहलोत यांच्याविरुद्ध महिनाभरापूर्वी बंड केल्यानंतर पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्या वेळी, माझ्याजवळ पक्षात कोणतेच पद नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी हात वर केले होते. त्यामुळे आता राहुल गांधी यांना भेटून उपयोग नाही, अशी सचिन पायलट यांची भावना झाली होती. मात्र, प्रियांका वढेरा यांनी त्यांची समजूत घालून त्यांना राहुल गांधींच्या भेटीसाठी तयार केले आणि सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची भेटही घडवली. सचिन पायलट यांची, अहमद पटेल वगळता कॉंग्रेस पक्षातील अन्य कोणत्याही नेत्यांना भेटण्याची तसेच त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी नव्हती. त्यामुळे प्रियांका वढेरा यांना पुढे यावे लागले. सचिन पायलट यांना पक्षात कायम ठेवण्यासाठी कॉंग्रेसच्या नेतृत्वाने कोणते आश्वासन दिले, हे अजून समजले नसले, तरी अशोक गहलोत मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत राजस्थानच्या राजकारणात सचिन पायलट आता राहणार नसल्याचे समजते. पायलट यांच्या काही समर्थक आमदारांचा, काही महत्त्वाची खाती देत गहलोत यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करावा लागणार आहे. वर्ष-दोन वर्षांत गहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोपवण्यात येणार आहे. आजच गहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवणे कॉंग्रेसच्या नेतृत्वाला शक्य नाही. कारण असे केले तर पक्षात पुन्हा ‘तरुण तुर्क विरुद्ध म्हातारे अर्क’ असा, अजूनही न विझलेला संघर्ष पुन्हा उफाळून येऊ शकतो.
राजस्थानात कॉंग्रेसचे सरकार वाचवण्याचे पूर्ण श्रेय अनुभवी नेते म्हणून अशोक गहलोत यांनाच आहे, यात शंका नाही. गहलोत मुख्यमंत्रिपदावर आहेत तोपर्यंत पायलट यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावरची पक्षाची जबाबदारी दिली जाणार आहे. नंतर गहलोत यांना राष्ट्रीय राजकारणात आणून पायलट यांना राजस्थानमध्ये पाठवले जाईल. आता राजस्थान काँग्रेसच्या एका म्यानात गहलोत आणि पायलट अशा दोन तलवारी एकाच वेळी राहू शकत नाहीत, त्यामुळे एक तलवार राष्ट्रीय राजकारणात, तर दुसरी राजस्थानमध्ये ठेवावी लागणार आहे.
 
 
भाजपाचे दरवाजे बंद झाल्यामुळे पायलट यांना परत कॉंग्रेसच्या दारात यावे लागले, ही वस्तुस्थिती आहे. मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे बंड आणि राजस्थानातील कॉंग्रेसचे बंड, यात गुणात्मक फरक आहे. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे   यांनी बंड केले तेव्हा त्यांच्याजवळ, राज्यात भाजपाचे सरकार बनू शकेल, एवढे आमदार होते. याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे यांचा मुख्यमंत्री होण्याचा आग्रह नव्हता, त्यांना फक्त काँग्रेसला धडा शिकवायचा होता. राजस्थानात मात्र सचिन पायलट यांचा आग्रह स्वत: मुख्यमंत्री होण्यासाठी होता, जो भाजपासाठी अडचणीचा होता. दुसरा म्हणजे पायलट यांच्याजवळ, राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होईल एवढे आमदारही नव्हते. सचिन पायलट यांना त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपात घेऊनही राज्यात भाजपाचे सरकार येणार नसेल तर त्यांना पक्षात कशासाठी घ्यायचे, असा भाजपासमोर प्रश्न होता. दुसरीकडे, राज्याच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचीही यासाठी तयारी नव्हती. दिल्लीत, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्‌डा तसेच संघटन मंत्री बी. एल. संतोष यांची भेट घेऊन राजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे भाजपाचे दरवाजे पायलट यांच्यासाठी आपोआपच बंद झाले. त्यामुळे काँग्रेसमध्ये परतण्याचे दोर गहलोत यांनी पूर्णपणे कापण्यापूर्वीच आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवण्याशिवाय पायलट यांच्यासमोर पर्याय नव्हता. कारण पायलट गटातील अनेक आमदारांनी आपली आमदारकी वाचवण्यासाठी गहलोत यांच्या गटात परतण्याची तयारी केली होती. पायलट यांनी आणखी थोडा उशीर केला असता, तर त्यांच्यासोबत चार-पाच आमदारच उरले असते. मुख्यमंत्रिपद तर मिळाले नाही, पण पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्षपदही गमवावे लागले, त्यामुळे त्यांची स्थिती आजतरी ‘तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले,’ अशी झाली आहे. आता हातातील धुपाटण्याचा वापर त्यांना सध्यातरी गहलोत यांच्याविरुद्ध करता येणार नाही. राजकारणात कधीकधी माघार घेणे शहाणपणाचे असते, तेच नेमके पायलट यांनी केले. कॉंग्रेस पक्षात योग्य वेळेची आणि योग्य संधीची वाट आता त्यांना पाहावी लागणार आहे. पायलट यांना पक्षात परत आणण्याचा गाजावाजा करत राहुल गांधी यांनी पुन्हा कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मार्ग प्रियांका वढेरा यांनी सुकर केला आहे. पायलट यांचे विमान लॅण्ड झाले असले, तरी राहुल गांधी यांच्या विमानाने काँग्रेस अध्यक्षपदाच्या दिशेने टेकऑफ केले आहे...
 
9881717817