मेळघाटातील रान हळदीवर संशोधन

    दिनांक :13-Aug-2020
|
डॉ. मंगेश डगवाल यांचा पुढाकार
तभा वृत्तसेवा
अंजनगाव सुर्जी, 
श्रीमती राधाबाई सारडा महाविघालय येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश डगवाल यांनी त्यांच्या संशोधनामध्ये मेळघाटातील मोठ्या प्रमाणात आढळणारी रानहळद ही दुर्लक्षित वनस्पती मानवी जीवनाला औषधी वनस्पती म्हणून किती उपयुक्त आहे, हे या संशोधनातून सिद्ध केले आहे.

Halad _1  H x W 
 
ही वनस्पती महाराष्ट्रातील सर्वच भागात आढळून येत असली तरी समुद्रसपाटी पासून 700 मीटर पेक्षा अधिक उंचीवर मेळघाट या भागात अधिक प्रमाणात आढळून येते. या वनस्पतीचा मानवी जीवनात अनेक आजारावर उपयोग होतो. त्यापैकी मूळव्याध, जखमेवर व अँटिसेप्टिक म्हणून सुद्धा ही वनस्पती उपयुक्त ठरते. अशी वदंता आहे की मेळघाटातील लोक त्याचा उपयोग संमोहन, तांत्रिक वशीकरण व मायाजाल याकरिता सुद्धा करतात. या वनस्पतीचे आणखी एक आकर्षण म्हणजे, त्याला येणारे फूल होय. एकाच भौगोलिक भागात हे वेगवेगळ्या रंगाचे असते व ते फूल साधारणतः जून ते सप्टेंबर दरम्यान उमलते.
 
यापूर्वीच्या संशोधनामध्ये जंगलात आढळणार्‍या वेगवेगळ्या वनस्पतीजन्य प्रजातीची नोंद केली गेली आहे, परंतु डॉ. डगवाल यांनी आपल्या संशोधनामध्ये एकाच प्रजातीतील वनस्पतीमध्ये आढळणारे वेगवेगळे प्रकार शोधून काढले आहे. साधारणपणे एकाच प्रकारच्या वनस्पती या जर वेगवेगळ्या भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थितीमध्ये वाढल्या तर त्यांच्यात दृश्य आणि अदृश्य असे बदल होतात . परंतु मेळघाट या भौगोलिक भागाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थितीत वाढणारी रानहळद या वनस्पतीत वैविध्यता आढळून येते. दृश्य स्वरूप म्हणजे रंग रूप व अदृश्य म्हणजे रासायनिक व जनुकीय स्वरूप होय.
 
कोणतीही नवीन प्रजाती अकस्मात तयार होत नाही, तर अस्तित्वात असलेल्या प्रजातीमध्येच बदल घडून नवीन प्रजाती तयार होत असते. रानहळदी सारख्या वैविध्य असणार्‍या या वनस्पतीतील बदल म्हणजे भविष्यातील नवप्रजातीच्या उत्क्रांतीचा पाया आहे. त्यामुळे ही धरोहर मानवी जीवनासाठी संजीवनी ठरू शकते. अशा या मेळघाटातील रानहळदीच्या पट्ट्याचे संरक्षण व संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. मंगेश डगवाल यांच्या संशोधनाचा विषय ‘मेळघाटातील कर्क्युमा प्रजातींमध्ये इन्फ्रास्पिकिफिक जैवविविधता-आकलन’ हा असून त्यांना या संशोधनाकरिता शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावतीच्या संबंधित विभागाच्या माजी संचालक डॉ. प्रभा भोगांवकर यांनी मार्गदर्शन केले आहे. डॉ. डगवाल यांच्या मते ही प्रजाती आयुर्वेदिक व उत्क्रातींच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. त्या दृष्टीने त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या वनस्पतीच्या संवर्धनाकरिता त्याची लागवड आपल्या घरी सुद्धा केली आहे.